-हदयपिळवणारी घटना..होळीच्या दिवशी आईने पेटवून घेतले आईला जळताना पाहुन मुली धावुन जवळ गेल्याने दोन्ही चिमुकल्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू


वैजापूर (प्रतिनिधी) पती पत्नीच्या वादातुन एका महिलेने अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतले, यावेळी आईकडे धावलेल्या दोन चिमुकल्या मुलींचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील आंचलगाव येथे घडली आहे.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैजापूर तालुक्यातील आंचलगाव येथील रहिवासी आप्पासाहेब आसाराम कोकाटे व पत्नी कोमल यांच्या कौटुंबिक वादातून कोमलने अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतलं. पेटवून घेतलेल्या आईकडे धाव घेतलेल्या दोन मुलींचा होरपळल्याने मृत्यू झाला असून पती पत्नीवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आईकडे धावलेल्या दोन मुलींचा होरपळून मृत्यू

वैजापूर तालुक्यातील आंचलगाव येथे कौटुंबिक वादातून रात्री कोमलने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्यानंतर तिला वाचविण्यासाठी आलेला पती आप्पासाहेब आसाराम कोकाटे व आईकडे धावलेल्या दोन चिमुकल्याही गंभीररित्या भाजल्या. यात एका सात महिन्यांच्या चिमुकलीचा  जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला तर सहा वर्षांच्या कल्याणी या दुसऱ्या मुलीचा उपचार सुरू असताना रात्री घाटीत मृत्यू झाला. पत्नी आणि मुलींना वाचवण्यासाठी पतीनेही प्रयत्न केला. मात्र, या आगीत पतीही गंभीररित्या जखमी झाला होता या घटनेमुळे घरातील साहित्यही आगीत जळाल्याने मोठे नुकसान झाले.

ही घटना ऐन होळी सणाच्या दिवशी घडली आहे. गंभीर भाजलेल्या दाम्पंत्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत उपचार सुरू आहे. सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेमध्ये दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. तर आई-वडील दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!