महाशिवरात्री स्पेशल. कायगाव टोका येथील पेशवेकालीन महादेव मंदिरात यात्रोत्सव


गंगापूर (प्रतिनिधी)
दक्षिण गंगा गोदावरी आणि अमृतवाहिनी प्रवरा या दोन नद्यांच्या पवित्र संगमावर कायगाव टोका (ता.गंगापूर आणि नेवासा) याठिकाणी महादेवाची प्राचीन मंदिरे आहेत. महाशिवरात्री निमित्त शुक्रवारी (दि.८) येथे यात्रोत्सव संपन्न होत आहे.

कायगाव टोका येथील परिसर हा दंडकारण्यात येतो. प्रभू श्रीराम दक्षिणा पथात असताना येथून त्यांनी मार्गक्रमण केले असल्याचे पुरावे आहेत. याबाबत पुण्याचे वैमानिक श्री भावे, श्रीराम पथाचे अभ्यासक राम अवतार शर्मा आणि जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी कायगाव टोका क्षेत्राचा उल्लेख आपल्या अभ्यासपूर्ण लिखाणात केला असल्याची माहिती नदी आणि मंदिर संस्कृतीचे अभ्यासक पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी दिली.

कायगाव टोका येथे दोन नद्यांचा संगम असल्याने हे क्षेत्र पवित्र आहेच सोबतच प्रभू श्रीरामाचा पदस्पर्श लाभल्याने येथील क्षेत्राला विशेष महात्म्य देखील प्राप्त झाले. यामुळे अठराव्या शतकात पेशव्यांनी श्रीरामाचे उपास्य दैवत म्हणून महादेव मंदिरांची उभारणी केली. हेमाडपंथी शैलीतील दगडात कोरीव काम केलेल्या मंदिरांची उभारणी त्यांनी केली. येथील मंदिरे शिल्पकलेचा उत्तम नमुना आहेत, असे राहुल कुलकर्णी यांनी सांगितले. नाशिक येथील मंदिर शैलीशी कायगाव टोका येथील मंदिरे मिळतीजुळती आहेत.

पेशव्यांनी कायगाव येथे भगवान रामेश्वर आणि मुक्तेश्वर तर टोका परिसरात सिध्देश्वर, घटेश्वर, संगमेश्वर, गौतमीश्वर, म्हाळेश्वर या मंदिरांची उभारणी केली. यापैकी रामेश्वर, सिध्देश्वर आणि घटेश्वर ही तीन मंदिरे भव्यता आणि सुंदरतेचे दर्शन घडवतात. ही मंदिरे उभारण्यासाठी नेवासे परिसरातील खाणीतील काळ्या पाषाणाची उपयोग करण्यात आला आहे. मंदिरांभवती पेशव्यांनी नगरी वसल्याचे देखील पुरावे सापडले आहेत. कायगाव येथे श्रीरामाचे मंदिर असून येथे रामनवमी उत्सवाची तेव्हापासूनची परंपरा आज देखील सुरू आहे. महाशिवरात्री निमित्त यात्रा देखील भरते.

*सिध्देश्वर मंदिर अप्रतिम शिल्प समूह*
सिध्देश्वर हे तीन मंदिरांचा समुह असणारे क्षेत्र आहे. भगवान विष्णू, महादेव आणि गद्रादेवी अशी तीन मंदिरे येथे आहेत. देवीचे मंदिर तर अप्रतिम शिल्प आहे. चांदणी आकारातील या मंदिरावर नवार्ण देवतांच्यि मूर्ती कोरलेल्या आहेत. सिध्देश्वर मंदिरावर दशावतार, पुराणातील काही प्रसंग आणि पेशवे दरबार चित्रित आहे. गोदा आणि प्रवरेच्या संगमावर भाविकांना स्नानासाठी घाट, भव्य हत्तीघाट बांधले असल्याचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!