बाल संरक्षण समिती व गंगापूर पोलिसांनी पालकांचे समुपदेशन करून बोलेगांव येथील बालविवाह थांबविला

गंगापूर (प्रतिनिधी) बोलेगांव येथील ज्ञानाई आश्रमात बालविवाहाची तयारी सुरू असताना गंगापूर बाल संरक्षण समिती व पोलीसांनी समुपदेशन करून विवाह रोखला.

गंगापूर बाल संरक्षण समिती व पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, गंगापूर तालुक्यातील बोलेगांव येथील ज्ञानाई आश्रमात एका अल्पवयीन मुलीचा ३० मार्च रोजी प्रवरासंगम येथील युवकाशी बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहीती मिळाल्यावरून
बोलेगांव येथे जाऊन पाहणी केली असता तेथे विवाह सोहळ्याची  पूर्ण तयारी दिसून आली. यावरून बाल संरक्षण समिती व पोलीसांनी तात्काळ मुलीच्या आई-वडिलांची भेट घेतली असता हे कुटुंब वाळुज तालुका गंगापूर येथील असल्याचे समजले त्यांना विश्वासात घेऊन अधिक चर्चा केली असता नात्यातीलच चांगल्या मुलाचे लग्नासाठी मागणी आल्याने त्यांनी मुलीचा विवाह लावून देत असल्याचे मान्य केले. परंतु पथकाने मुलीचे आधार कार्ड तपासले असता तिचे वय १६ वर्ष असल्याचे निष्पन्न करून ती अल्पवयीन असल्याबाबत आई-वडिलांच्या निदर्शनास आणून दिले.
बाल संरक्षण समितीच्या समुपदेशक तथा बालविकास प्रकल्प अधिकारी प्रतिभा परदेशी यांनी बालविवाहामुळे मुलींच्या आयुष्याबाबत होणाऱ्या दुष्परिणामाबाबत व कायदेशीर बाबींची संपूर्ण माहिती देऊन पालकांचे व नातेवाईकांचे समुपदेशन केले त्यामुळे आई वडील त्यांचे मन व मत परिवर्तन होऊन त्यांनी हा विवाह न करण्याचे मान्य केले आहे.

तसेच मुलगी ही सज्ञान झाल्यानंतरच तिच्या मर्जीनुसार तिचा विवाह करू असे आवर्जून सांगितले. याबाबत बंधपत्र लिहून घेऊन सदर मुलीला बालकल्याण समितीच्या समक्ष हजर करण्यात येऊन त्यांचे निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

यावेळी मुलींच्या आई वडील व इतर नातेवाईक यांना बालविवाह संदर्भात कायदेशीर बाबीचे माहिती देऊन मुलीचे अल्पवयात लग्न करणे हा कायदेशीर रित्या गुन्हा असून अशी जाणीव पूर्वक बालविवाह ठरविण्यास किंवा त्यास प्रोत्साहन तसेच सोहळा पार पाडणाऱ्या दोन वर्ष सक्त मजुरी व दोन लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार होऊ शकते यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलांचे लवकर लग्न करण्याचा घाट न धरता तिला उच्चतम शिक्षण देण्यास प्रवृत्त करावे, ज्यामुळे भविष्यात मुली स्वतःचे पायावर उभे राहू तिचे स्वतःचे उज्वल भविष्य निर्माण करून समाजात तिची एक विशिष्ट ओळख निर्माण करू शकेल.

ही कारवाई ही  पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया,  अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सत्यजित ताईवाले , बालविकास प्रकल्प अधिकारी प्रतिभा परदेशी, वाळुजच्या सुपरवायझर चित्रा खोचे, ग्रामसेवक आर एस चराटे तसेच गंगापूर पो. स्टे. चे पो काॅ जारवाल व बिट जमादार कांचन शेळके यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!