मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय माघार नाही मनोज जरांगे यांचा जाहीर सभेत निर्धार


गंगापूर (प्रतिनिधी)१४ ऑक्टोबरला आंतरवाली येथे जाहीर सभा होणार असून गंगापूर तालुक्यातील प्रत्येक घरातील नागरिकांनी घरी न बसता सभेला उपस्थित राहुन एकीचे बळ दाखवा. जरांगे पाटील
मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर जरांगे यांची मंगळवारी (दि.११) येथील राधाकृष्ण मंगलकार्यालय येथे जाहीर सभा झाली. सभेच्या अगोदर कायगांव टोका येथील हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतीस्थळाला जरांगे यांनी भेट देऊन अभिवादन केले.पुढे जरांगे म्हणाले, ‘छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी असून येथूनच राज्याची दिशा फिरते. या सभेने आंदोलनाचे विराट रूप दाखवले आहे. मराठा आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब जावळे, देविदास वडजे, विनायक मेटे, काकासाहेब शिंदे यांनी बलिदान दिले. २९ ऑगस्टला आंतरवाली सराटी येथे सुरू झालेल्या आंदोलनावर लाठीहल्ला करण्यात आला. इतके निर्दयी सरकार मी आतापर्यंत पाहिले नव्हते. मायभगिनींचे रक्त सांडल्यामुळे आता हटायचे नाही, असे ठरवले आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रमुख मागणी आहे. मराठा हे कुणबी असल्याचे हजारो पुरावे असल्यामुळे आरक्षणावर आमचा हक्क असल्याचे सांगत सरकारने
टिकणारे आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केली.

पाच हजार कुणबी- मराठा पुरावे उपलब्ध आहेत. शिवाय, २००४ च्या शासन निर्णयानुसार मराठा हे कुणबी असल्याचे मान्य करण्यात आले आहे. या निर्णयाचा आधारही आरक्षणासाठी घेता येईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सभेपूर्वी मुलीने जंराडे यांचें रेखाटलेले चित्र भेट दिले . तालुक्यातून सभेला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते,

तर माझा ‘कचका’ दाखविणार

‘माझा मराठा आरक्षणाला विरोध नसल्याचे ‘ते’ नेते म्हणाल्यामुळे पाच दिवसांपासून त्यांच्यावर बोलत नाही. पण कुणी मराठा आरक्षणाला विरोध केला तर माझा ‘कचका’ दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता केली. येत्या २४ ऑक्टोबरला सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपणार आहे. त्यापूर्वी १४ ऑक्टोबरला आंतरवाली येथे जाहीर सभा होणार असून गंगापूर तालुक्यातील प्रत्येक घरातील नागरिकांनी घरी न बसता सभेला उपस्थित राहुन एकीचे बळ दाखवा, ही शेवटची संधी असुन ही संधी दवडू नका, असे आवाहन जरांगे यांनी केले

ओबीसी बांधवांना मराठा समाजाची भूमिका समजावून सांगण्याची गरज

विदर्भ, खान्देश, कोकणातील पठारी भागातील मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळाले आहे. फक्त मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश नाही. ही आकडेमोड ओबीसी बांधवांना नीट समजावून सांगितली तर त्यांचा विरोध संपेल. उलट मराठा आरक्षणाला ते पाठिंबा देतील. राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी ४० दिवसांची मुदत दिली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, असा निर्धार मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी येथे जाहीर सभेत केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!