शिवजयंती शिवरायांचे विचार वाचून साजरी करा -कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन

शिवजयंती शिवरायांचे विचार वाचून साजरी करा -कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन


खुलताबाद(प्रतिनिधी) – आजच्या सोशल मिडीयाच्या युगात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देऊन, स्टेटसला फोटो ठेवून शिवराय कळणार नाहीत तर शिवराय हे त्यांच्या विचारातून आणि कार्यातून समजत असतात. त्यामुळे आजच्या तरूणांनी शिवजयंती शिवरायांचे विचार वाचून साजरी करावी असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तरूणांना केले.

युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने १२ ते १९ फेब्रुवारी दरम्यान राज्यभर स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्वराज्य सप्ताहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी वेरूळ येथील मालोजीराजे भोसले गढीसमोर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रयतेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा.आ.कैलास पाटील, महिला जिल्हाध्यक्ष स्वाती कोल्हे, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, सुनील मगरे, अशोक गायकवाड, संतोष कोल्हे, अभिजीत देशमुख, जुबेरलाला, अंकुश काळवणे, महेश उबाळे, ज्ञानेश्वर दुधारे, सुनीता आहेवाड, दत्ता भांगे, गजानन फुलारे, अनुराग शिंदे, रावसाहेब फुलारे, विनोद जाधव, प्रभु बागुल आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. छत्रपती शिवराय फक्त एका जाती, धर्माचे नव्हते. मात्र आज आपण छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, सेवालाल महाराज या महापुरूषांना जाती जातीमध्ये वाटून घेतले आहे. मात्र हे महापुरूष कधीच एका जातीधर्माचे नव्हते. त्यामुळे महापुरूषांच्या जयंती सर्वांनी मिळून साजर्‍या केल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची ओळख प्रत्येकाच्या मनात कोरली जावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने हा स्वराज्य सप्ताह आयोजित करण्यात आला असल्याचे ना.धनंजय मुंडे यांनी सांगितले.

आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज या जगातील एकमेव असे राजे आहेत ज्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. स्वराज्यात शेतकर्‍यांचे रक्षण झालं पाहिजे, त्यांचा शेतसारा माफ झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला आठवतात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज आपण हा शिवमहोत्सव स्वराज्याची शपथ घेऊन साजरा करत आहोत असे देखील आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले. मा.आ.कैलास पाटील, स्वाती कोल्हे यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश उबाळे, सुत्रसंचालन डॉ.समाधान इंगळे यांनी तर आभार तालुकाध्यक्ष अनिल चव्हाण यांनी मानले.
शाहीर गणेश गलांडे यांनी आपल्या पाहडी आवाजाने सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाड्यातून अंगावर रोमांच उभे राहीले. तर छत्रपती संभाजीनगर शहरातील रणझुंजार ढोल पथकाचे शिवराज शिंदे व सहकाऱ्यांनी आपल्या ढोलताशांच्या गजराने गढी परिसर दुमदुमून सोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!