विद्यार्थिनींनी शिक्षणाच्या माध्यमातून विकास साधावा – सुशीलकुमार मंत्री

गंगापूर(प्रतिनिधी)गंगापूरातील धूत कन्या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
सध्याचे युग हे स्पर्धेचे असून सर्वच क्षेत्रात गुणवत्तेला महत्व असल्याने विद्यार्थिनींनी चांगले शिक्षण घेउन शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा व देशाचा विकास साधावा असे आवाहन शालेय समितीचे अध्यक्ष सुशिलकुमार मंत्री यांनी स्नेहसंमेलनात बोलताना केले.
गंगापूर येथील श्रीमती राजाबाई माधवलालजी धूत कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी यावेळी शालेय समितीच्या सदस्या तृप्ती मंत्री, प्रवीणकुमार सोमाणी, राजेंद्र सरोवर, संतोष भालेराव, मुख्याध्यापिका संजीवणी बेंद्रे, सीमा सीनकर, विदुला शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुशीलकुमार मंत्री पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलींमध्ये गुणवत्ता असूनही कौटुंबिक, सामाजिक अडचणीमुळे शाळेची नियमीत उपस्थिती, गृहपाठ यावर मर्यादा येतात यासाठी पालकांनी पुढाकार घेउन मुलींच्या अशा अडचणी दूर कराव्यात. संस्थेचे अध्यक्ष माजी.खा. राजकुमार धूत व अक्षयकुमार धूत यांची ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठीची तळमळ व शाळेच्या विकासासाठीच्या सहकार्यामुळेच शाळेचा नावलौकिक जिल्हाभरात पोहचला आहे.
या स्नेहसंमेलनात विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय एकात्मता, धार्मिक, सामाजिक, विनोदी, लोकगीते आदींचे सलग चार तास एकापेक्षा एक सरस नृत्य गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मागील वर्षी दहावी बारावी परीक्षांमध्ये सर्वप्रथम, द्वितीय आलेल्या विद्यार्थिनींचा स्मृतीचिन्ह व रोख बक्षिसे देउन गौरव करण्यात आला. याशिवाय स्नेहसंमेलनप्रसंगी घेण्यात आलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका संजीवनी बेंद्रे यांनी केले सुत्रसंचालन वैशाली मोरे यांनी तर आभार प्रदर्शन अर्चना राऊत यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!