धक्कादायक.प्रियकराकडून डॉक्टर प्रेयसीवर लॉजवर नेत ब्लेडने वार. विरोध केल्याने पुढील अनर्थ टळला


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)
मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरातील एका लॉजवर डाॅक्टर प्रेयसी आणि टेक्निशियन प्रियकर गेले. तेथे अर्ध्या तासात दोघांमध्ये खटके उडाले. ‘एक महिन्यापासून तू दुसऱ्या मुलाबरोबर बोलतेस’ असे म्हणत प्रियकराने तिच्या मानेवर, हाताच्या बोटावर सर्जिकल ब्लेडने वार केले. त्यानंतर स्वत:च्या गळ्यावर तीन वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (१७ एप्रिल) दुपारी दीडच्या सुमारास घडली. दोघांनाही जवळच्या एका खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे, अशी माहिती क्रांती चौक पोलिसांनी दिली. निखिल दादाराव यादव (२५, रा. गजानन मंदिराजवळ, मूळ रा. जालना) असे आरोपीचे नाव आहे.
गजानन महाराज परीसरात एका खासगी रुग्णालयात डाॅक्टर मुलीची त्याच रुग्णालयातील टेक्निशियनबरोबर मैत्री झाली. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. एक महिन्यापूर्वी प्रेयसी दुसऱ्यांसोबत बोलते, असे म्हणत प्रियकर तिच्यावर संशय घेऊ लागला. यातून दोघांमध्ये वाद झाला होता. काही दिवसांनी वाद मिटला व ते पुन्हा एकमेकांसोबत राहू लागले. ते बुधवारी दुपारी मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरातील एका लॉजवर गेले. दोघे अर्धा तास रूममध्ये थांबले. त्यानंतर अचानक दोघांमध्ये वाद झाला. प्रियकराने प्रेयसीच्या मानेवर आणि हाताच्या बोटावर सर्जिकल ब्लेडने वार केले. त्यानंतर प्रियकराने स्वत:च्या मानेवर तीन वार केले. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून निखिलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास क्रांती चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक देविदास शेवाळे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!