दोन दिवसांपासून नामका क्षेत्रात बंद केलेला विद्युत पुरवठा वाल्मिक शिरसाट व शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाने सुरळीत सुरू


गंगापूर (प्रतिनिधी) नांदूर मधमेश्वर एक्सप्रेस कॅनॉलच्या वरच्या भागातील पाणी चोरी रोखण्यात अपयशी ठरलेले पाटबंधारे विभागाचे अधिकारी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपले अपयश झाकण्यासाठी गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा संघटक वाल्मिक शिरसाठ यांनी केला आहे.

मात्र गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची हक्काची वीज एक मिनिट सुद्धा बंद होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत शिरसाठ यांनी रविवारी १८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांसह वीज वितरण कंपनीच्या वरखेड उपकेंद्रासमोरच ठिय्या आंदोलन केले. तासभरात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत सरसकट कट केलेला सर्व शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरळीत करण्याचे आदेश दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

याविषयी अधिक माहिती अशी की नांदूर मधमेश्वर कालवा पाटबंधारे विभागाने गंगापूर वैजापूर तालुक्यातील शेतीसाठी सिंचनासाठी वापरण्यासाठी रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन आठ फेब्रुवारी पासून सुरू केले आहे मात्र एक्सप्रेस कॅनॉलच्या वरच्या भागांमध्ये काही धनदांडगे बागायतदार एक्सप्रेस कॅनॉल मधून रात्रंदिवस पाण्याची चोरी करतात त्यामुळे टेल पर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.मात्र आपला गलथान कारभार झाकण्यासाठी नांदूर मधमेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता यांना पत्रव्यवहार करून सोळा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान गंगापूर वैजापूर तालुक्यातील नांदूर मधमेश्वर कालवा लाभधारक क्षेत्रातील सर्व गावांचा वीज पुरवठा दररोज बावीस तास बंद करावे असे पत्र दिले होते या पत्राची अंमलबजावणी करत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गंगापूर तालुक्यातील मांजरी,नेवरगाव,वाहेगाव,वरखेड,शिंगी,पिंपरी,नरहरी रांजणगाव,अकोली वाडगाव,काटेपिंपळगाव जाकमाथा आदी गावांचा वीज पुरवठा मागील दोन दिवसापासून बंद केलेला होता.या तुघलकी कारभारावर आक्षेप घेत वाल्मिक शिरसाठ यांनी सर्व शेतकऱ्यांना सोबत घेत आक्रमक पवित्रा घेतला. सध्या शेतकऱ्यांचा रब्बीचा हंगाम सुरू असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टरबूज,गहू,हरभरा कांदे,अद्रक यासारखे अनेक मोसमी पिके उभे आहेत मात्र पुढील आठवडाभर विद्युत पुरवठा २२ तास खंडित राहिल्यामुळे शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास यामुळे हिरावला जाण्याची भीती व्यक्त केली.सदर अनागोंदी कारभाराबाबत वाल्मीक शिरसाठ यांनी सुरुवातीला या विभागाचे सहाय्यक अभियंता खंबायतकर तसेच उपकार्यकारी अभियंता भिवसने यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणत्याही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे शिरसाठ यांनी या सर्व घटनेची कल्पना उपविभागीय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड,तहसीलदार सतीश सोनी, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता भूषण पहुरकर यांना देऊन सदर परिपत्रक ही शेतकऱ्यांवर अन्याय करणारे असल्याचे सांगितले व तात्काळ शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरू करावा अशी मागणी करत वरखेड वीज उपकेंद्रासमोर आंदोलन सुरू केले.आंदोलनामध्ये वरखेड शिंगी,पिंपरी,रांजणगाव नरहरी,अमिनाबाद,आदि भागातील शेतकरी सहभागी झाले होते.आंदोलन सुरू करताच प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली व तात्काळ नियमित वीज पुरवठा सुरळीत करण्याची आदेश दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!