जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका; राज्यभरात संतापाची लाट…

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका; राज्यभरात संतापाची लाट…


जालना (प्रतिनिधी) जालन्यात मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जविरोधात राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.
 जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला. तर, आंदोलकांनी दगडफेक केल्याने लाठीचार्ज करावा लागला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. गेल्या चार दिवसापांसून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरु होतं. आज सकाळी आंदोलकाची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अचानक लाठीमार सुरू केला. तर, ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यानंतर जमाव पांगविण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. 

29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणकर्त्या आंदोलकांची प्रकृती खालावण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली. पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला. तर, आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्ज केला.  

पोलिसांनी केलेल्या कारवाईचे वृत्त राज्यभरात पसरल्यानंतर सगळ्याच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेवटीवार, छत्रपती संभाजी राजेंपर्यंत विरोधी पक्षातील सगळ्यांनीच या कारवाईचा निषेध केला आहे. गृह खात्याकडून अशी अतिरेकी भूमिका घेणे चुकीचे आहे. या लाठी हल्ल्याचा आपण निषेध करत असल्याचे पवार यांनी म्हटले. 

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर समाजाची फसवणूक सुरू आहे.* 50 टक्क्यांची मर्यादा वाढवल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही, हे सगळ्यांना माहिती होते. मात्र, ही बाब माहिती असूनही सरकारने खोटं आश्वासन दिले. पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेवटीवार यांनी म्हटले. मराठा आरक्षणासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी त्यांनी केली. मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्यांना मराठा समाज नक्कीच धडा शिकवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. 

गृह खात्याची अतिरेकी भूमिका निषेधार्ह; शरद पवारांनी व्यक्त केला संताप

जालन्यातील उपोषण आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईविरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त केला. उपोषण थांबावावं असा पोलिसांचा आग्रह होता. आंदोलक आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली होती. आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. त्यानंतर काही कारण नसताना लाठी हल्ला झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. गृह खात्याकडून अशी अतिरेकी भूमिका घेणे चुकीचे आहे. या लाठी हल्ल्याचा आपण निषेध करत असल्याचे पवार यांनी म्हटले. 

मराठा आंदोलकांनी काय म्हटलं आहे?

धुळे सोलापूर रस्त्यावर आंदोलकांनी आता बस आणि वाहनांची जाळपोळ सुरु केली आहे. आंदोलकांनी असं म्हटलं आहे की पोलिसांनी आमच्या आंदोलकांना मारण्यास सुरुवात केली. आम्ही शांततेत आंदोलन करत होतो तरीही लाठीचार्ज करण्यात आला असं मराठा आंदोलकांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी काय म्हटलं *आहे?*

आम्ही शांततेत आंदोलन सुरु केलं होतं. आम्ही शांतपणेच उपोषण आंदोलन करत होतो. काल आमचं शिंदेसाहेबांचं (मुख्यमंत्री) आणि आमचंही बोलणं झालं. आज अचानक खाडे म्हणून कुणीतरी आले. मला म्हणाले की तुम्ही उपचार घ्या. त्यानंतर मी हो म्हटलं. मात्र पोलिसांनी बहुदा आंदोलन मोडायचं ठरवलं आहे. पण माझं मराठा आंदोलकांना आवाहन आहे की जाळपोळ करु नका, तोडफोड करु नका. जे काही झालं ते ब्रिटिशांच्या काळातही घडलं नव्हतं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सगळ्या बांधवांनी शांत रहावं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!