राजेंसाठी मसनवाट्यातही जाऊ…; मराठा आंदोलक मुख्यमंत्री यांच्याशी चर्चेला तयार, उदयनराजेंचा शब्दाला दिला मान

राजेंसाठी मसनवाट्यातही जाऊ…; मराठा आंदोलक चर्चेला तयार, उदयनराजेंचा शब्दाला दिला मान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याची आमची इच्छाही नाही. परंतु राजेंनी म्हटल्यावर आम्ही मसनवाट्यातही जायला तयार आहे असं आंदोलन मनोज जरांगे पाटील म्हणाले.

जालना (प्रतिनिधी) मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या आमरण उपोषण आंदोलनात झालेल्या लाठीचार्जच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,शरद पवारांपासून अनेक नेत्यांनी जालना येथे जात आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यात भाजपा खासदार उदयनराजेही आंदोलन करणाऱ्यांना भेटले. उदयनराजेंनी दिलेल्या शब्दावरून आंदोलकांचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे.

या आंदोलनातील प्रमुख मनोज जरांगे पाटील म्हणाले की, उदयनराजेंनी आम्हाला आश्वासन दिले आहे. त्यांच्याकडून ते पूर्ण झाले तरी खुश आणि नाही झाले तरी नाराज होणार नाही. आंदोलकांवर झालेले खोटे गुन्हे माघारी घेणार, मराठा आरक्षणाबाबत २ दिवसांत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू. त्याचसोबत जिल्हा पोलीस अधीक्षक ज्यांनी महिलांवर लाठीचार्ज करायला लावले त्यांना निलंबित करण्यास भाग पाडू असं आश्वासन उदयनराजेंनी दिले आहे. शरद पवारही येऊन भेटले, आंदोलनाची माहिती घेतली. आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याची आमची इच्छाही नाही. परंतु राजेंनी म्हटल्यावर आम्ही मसनवाट्यातही जायला तयार आहे. आमचे शिष्टमंडळ बैठकीसाठी जाईल. आंदोलन हा आमचा अजेंडा नाही. तोडगा निघणे महत्त्वाचे आहे. जास्त दिवस आंदोलन ताणू नये असं उदयनराजेंनी म्हटलं. त्याचसोबत कुणीही हिंसक आंदोलन करू नका. शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आरक्षण मिळवून घ्यायचे आहे. त्यामुळे सगळ्यांनी शांत राहावे असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा कार्यकर्त्यांना केले.

दरम्यान, मराठा समाजाने उद्रेक करू नये, मराठा समाजाच्या आक्रोशाची सरकारनेही दखल घ्यावी. सरकारने आरक्षणाबाबत जीआर काढून तोडगा काढावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जालनातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात सध्या मराठा समाजातील लोकं मोठ्या संख्येने उपस्थित आहे. याठिकाणी सभेचे स्वरुप आलेले आहे. मराठा आंदोलनकर्त्यांची भेट उदयनराजे आणि शरद पवार यांनी घेतली. जालनातील लाठीचार्जनंतर विरोधकांनी सरकारवर घणाघात करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!