जालन्यातील घटनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पडसाद, आज ठिकठिकाणी आंदोलनं आणि बंदची हाक. गंगापूर तालुक्यात टायर जाळून रास्तारोको तर मंगेश साबळे याने स्वतःची कार जाळुन केला निषेध..

जालन्यातील घटनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पडसाद, आज ठिकठिकाणी आंदोलनं आणि बंदची हाक. गंगापूर तालुक्यात टायर जाळून रास्तारोको तर मंगेश साबळे याने स्वतःची कार जाळली


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर मध्ये शुक्रवारी रात्री काही ठिकाणी बस जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर आज काही ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक यांनी केले शांततेचे आवाहन.


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात गेल्या चार दिवसापांसून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरु होतं. दरम्यान शुक्रवारी जरांगे यांना पोलीस रुग्णालयात नेण्यासाठी आले असता, आंदोलक आणि पोलिसांत झडप होऊन दगडफेकीसह लाठीचार्ज झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे पडसाद आता जालना जिल्ह्याचा शेजारचा जिल्हा असलेल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये उमटताना पाहायला मिळत आहेत.जिल्ह्यात शुक्रवारी रात्री काही ठिकाणी बस जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर आज अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. तर शहरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहे. 

जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना समोर आल्यावर याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन गावात टायर पेटवून रस्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. देवळाई चौकाजवळ सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखून टायर पेटवून दिले. शहरातील मुख्य बस स्थानकात बस पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सध्या शहरात आणि जिल्ह्यात सर्वत्र शांतता असून, पोलीस सर्वत्र लक्ष ठेवून आहेत. 

आज दिवसभरात कोठे काय? 

आज सकाळी 9 वाजेच्या दरम्यान पुंडलिकनगरमध्ये मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

सकाळी 10 वाजता मराठा समजाच्या वतीने आणि 11 वाजता राष्ट्रवादीकडून क्रांती चौकात निदर्शने करण्यात आले. 

सकाळी 11 वाजता वाळूजमध्ये मराठा समाजाच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले . 

बिडकीन गावात आज बंदची हाक देण्यात आली असून, पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकल मराठा समाज गंगापूर तालुका यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी डॉ अरुण ज-हाड व तहसीलदार सतीश सोनी यांना 12 वाजता लहान मुलगी देवीका परभणे हिच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

गंगापूर लासूर स्टेशन राज्य महामार्ग ३९ शेकटा फाटा येथे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयांकडून टायर जाळून मराठा बांधवावर लाठीचार्ज निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आलायं, मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी रास्ता रोको करत बराच वेळ आंदोलकांनी रास्ता रोको केला.

फुलंब्री तालुक्यातील पाल फाटा येथे गेवराई पायघाचे सरपंच मंगेश साबळे यांनी इंडिका गाडी जाळत मराठा समाजावर झालेल्या लाठी चार्ज च्या विरोधात तीव्र शब्दांत निषेध केला.

वैजापुर येथे निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

*जालना येथील घटनेनंतर पैठण येथे आज सकल मराठा समाजाच्या वतीने बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे*. 

जालना येथील अंतरवाली सराटी या गावात शांततेत चालू असलेला मराठा समाजाच्या आंदोलनावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला असून, अश्रूधाराचे नळकांडे फोडण्यात आले. त्यामुळे पोलिसांचा तसेच प्रशासनाचा जाहीर निषेध म्हणून सकल मराठा समाजच्या वतीने लासुर स्टेशनला आज पोलीस चौकी येथे निवेदन देण्यात आले. सकाळी दहा वाजता सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा यांच्यावतीने हे निवदेन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!