गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पत्र्याचं शेड पत्त्याच्या इमारती सारखं कोसळलं

डान्सर गौतमी पाटील हिचा कार्यक्रम सोमवारी 8 मे रोजी वैजापूर तालुक्यातील महालगांव येथे आयोजित करण्यात आला होता. महालगावमध्ये गौतमीच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झालेली होती. यावेळी एक अतिशय अनपेक्षित अशी घटना घडली.

वैजापूर (प्रतिनिधी) : डान्सर गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावेळी एक धक्कादायक प्रकार घडलाय. गौतमी पाटील मंचावर नृत्य करत होती. शेकडो चाहत्यांची समोर गर्दी बसलेली होती. चाहत्यांकडून गौतमीच्या नृत्य पाहण्याचा आनंद लुटला जात होता. पण याच दरम्यान एक अनपेक्षित घटना घडली. गौतमीचा डान्स पाहण्यासाठी एका दुकानाच्या पत्र्याच्या शेडवर बसेलेले चाहते थेट जमिनीवर आले. संबंधित दुकानाचं पत्र्याचं शेड जास्त जणांच्या वजनामुळे पत्त्यांच्या इमारतीसारखं खाली कोसळलं. संबंधित घटनेचा व्हिडीओ अतिशय चित्तथरारक असा आहे.

डान्सर गौतमी पाटील हिचा कार्यक्रम सोमवारी (8 मे) छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील महालगांव येथे आयोजित करण्यात आला होता. महालगावमध्ये गौतमीच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झालेली होती. जागा कमी पडल्याने गौतमीचे चाहते एका दुकानाच्या पत्र्याच्या शेडवर जावून बसले. नेहमीप्रमाणे आजही कार्यक्रमासाठी चाहत्यांची तुफान गर्दी केलेली होती. गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी चाहते मिळेल त्या ठिकाणी, जागा असेल त्या ठिकाणी उभे राहून किंवा बसून कार्यक्रम पाहत होते. या कार्यक्रमाला रंगत आलेली असताना अचानक पत्र्याचं शेड कोसळलं आणि मोठा गोंधळ उडाला.

संबंधित घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत संपूर्ण घटना स्पष्टपणे दिसत आहे. अतिशय थरारक अशी घटना दिसतेय. या घटनेत चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. पण ही घटना अतिशय भयानक आणि जीवघेणी होती. घटना घडली तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कार्यक्रम देखील बंद पडला.

याआधी छत कोसळून एकाचा मृत्यू

विशेष म्हणजे शेड कोसळून चाहते पडण्याची ही पहिली घटना नाही. याआधी एका ठिकाणी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात आलेल्या गर्दीमुळे एका जणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता. गौतमीचा डान्स पाहण्यासाठी त्यावेळी तिचे चाहते एका शाळेच्या कौलारु छतावर चढले होते. पण जास्त वजनाने ते छत कोसळलं होतं. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला होता.

गौतमीचा कार्यक्रम आणि राडा

गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आणि राडा हे जणू काही समीकरणच बनलं आहे. गौतमीच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होती. शेकडो तरुण तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी येतात. यावेळी काही टवाळखोर लोकं धिंगाणा घालतात. त्यामुळे पोलिसांना या टवाळखोरांना आवरणं कठीण होऊन बसतं. परिणामी पोलिसांनी अनेक ठिकाणी लाठीचार्ज करावा लागण्याच्या देखील घटना घडलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!