क्रूरतेचा कळस! हत्येनंतर चार दिवस करत होता मृतदेहाचे तुकडे; म्हणे, सरस्वतीने केली आत्महत्या…१६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी

क्रूरतेचा कळस! हत्येनंतर चार दिवस करत होता मृतदेहाचे तुकडे; म्हणे, सरस्वतीने केली आत्महत्या

घरात प्रवेश करताच पोलिसांचा उडाला थरकाप.
 ठाणे (प्रतिनिधी): गेल्या १० वर्षांपासून सरस्वती वैद्य (३२) हिच्याबरोबर एकत्रित राहणाऱ्या मनोज साने (५६) याने तिची निर्घृणपणे हत्या केली. कहर म्हणजे हत्येनंतर सलग चार दिवस तो तिच्या मृतदेहाचे तुकडे करीत होता, अशी माहिती नयानगर पोलिसांनी ठाणे न्यायालयात दिली. न्यायालयाने १६ जूनपर्यंत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश गुरुवारी दिले. 

बोरिवलीमध्ये शिधा वाटप केंद्राचे दुकान सांभाळणाऱ्या मनोजची सरस्वतीबरोबर २०१४ मध्ये ओळख झाली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनाही आई-वडील नाहीत. गेल्या १० वर्षांपासून ते एकत्र वास्तव्याला असले, तरी त्यांचे लग्न झालेले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सातत्याने भांडणे होत होती. याच भांडणातून अखेर मनोजने ४ जून २०२३ राेजी तिची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तो तिच्या मृतदेहाचे रोजच लहान लहान तुकडे करीत होता.   

*म्हणे सरस्वतीने केली आत्महत्या*  

सरस्वतीने विष पिऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूचे खापर आपल्या डोक्यावर येईल, म्हणून घाबरून पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचे मनोजने म्हटले आहे. मनोज आणि सरस्वती यांच्यातील भांडणाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याने सरस्वतीची हत्या केली का? की त्याने सांगितल्यानुसार तिने आत्महत्या केली का? याचा तपास पोलिस करत आहेत.

घरात प्रवेश करताच उडाला थरकाप   

  • पोलिसांनी इतर रहिवाशांच्या मदतीने फ्लॅटचे टाळे तोडून घरात प्रवेश केला तेव्हा आतील चित्र थरकाप उडविणारे होते. 
  • बेडरूममध्ये काळ्या रंगाचे प्लास्टिक व रक्त लागलेली एक इलेक्ट्रिकल सॉ मशीन आढळली. किचनच्या फरशीवर डोक्यापासून कापलेले केस वेणीसह दिसून आले. 
  • कूकरमध्ये सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केलेले मांस शिजवलेले होते. पातेल्यात शिजवलेले तुकडे दिसत होते. 
  • वॉश बेसिनमध्ये एका प्लास्टिक बकेटमध्ये हाडे आणि अर्धवट जळालेले मांसाचे तुकडे ठेवलेले होते. मृतदेहाचे घरात मिळालेले तुकडे गोळा करून पोलिसांनी जे. जे. रुग्णालयात पाठविले आहेत.

हत्या करण्यासाठी मनोजने नेमका कशाचा वापर केला? यात त्याचे आणखी कोणी साथिदार आहेत का? या सर्वच  बाबींचा सखोल तपास करण्यासाठी नयानगर पोलिसांनी आरोपी मनोजला १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी दीवाणी न्यायाधीश एम. डी. ननावरे यांच्याकडे केली. न्यायालयाने सर्व बाजू पडताळल्यानंतर आरोपीला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अत्यंत संवेदनशील प्रकरण असल्यामुळे नयानगर पोलिसांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!