नगरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, भररस्त्यात धारदार शस्त्राने वार

नगरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, भररस्त्यात धारदार शस्त्राने वार

नगरमध्ये हल्ल्याच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. काल रात्री राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली.
अहमदनगर (प्रतिनिधी)नगरमध्ये हल्ले आणि हत्येच्या घटना थांबवण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. अहमदनगरच्या सावेडी उपनगरातील एकविरा चौकात अजित पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. १५ जुलै रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. अंकुश चत्तर असे हल्ला करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. चत्तर यांच्यावर भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले आहेत. अंकुश चत्तर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे सह सात ते आठ जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदे आणि चत्तर यांच्यात आपसात वाद होते

भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यात आपसात काही कारणातून वाद होते. या वादातून काल रात्री साडेदहाच्या सुमारास अंकुश चत्तर हे सावेडी उपनगरातील एकविरा चौकात उभे असताना त्यांच्यावर हल्ला झाला. सात ते आठ जणांच्या टोळक्याने चत्तर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. तसेच गावठी कट्टा, लोखंडी रॉड, वायर रोप, काचेच्या बाटल्या याचाही गुन्ह्यात वापर करण्यात आला.

स्वप्निल शिंदे यांच्यासह सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी चत्तर यांना रुग्णालयात दाखल केले. चत्तर यांच्यावर नगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यानंतर पोलीस घटनास्थळाची पाहणी करत असताना घटनास्थळावरून काही अंतरावर असलेली एक टपरी अज्ञातांनी पेटवून दिली. यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात स्वप्निल शिंदे यांच्यासह सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगर शहरातील एका युवकाची तलवारीने हत्या करण्यात आली होती. तर शेवगाव येथे चोरट्याने दोघांची हत्या केली होती. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे पोलीस देखील अलर्ट मोडमध्ये असून, दररोज ठिकठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!