होरपळून मृत्यू झालेल्या २५ मृतदेहांची ओळख कशी पटविणार? डीएनए चाचणीसाठी पुण्याचे सहा सदस्यीय पथक दाखल

होरपळून मृत्यू झालेल्या मृतदेहांची ओळख कशी पटविणार? डीएनए चाचणीसाठी पुण्याचे सहा सदस्यीय पथक दाखल

बुलढाणा प्रतिनिधी : समृद्धी महामार्गावर अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या २५ जणांच्या मृतदेहांचा अक्षरश: कोळसा झालेला आहे. त्यामुळे काही मृतकांची नावे जरी कळाली असली तरी त्यांचा नेमका मृतदेह कोणता असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी डीएनए चाचणीच्या पर्यायासह प्रसंगी मृतकांच्या पार्थिवावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याच्या शक्यतेच्या दृष्टीनेही प्रशासनाने चाचपणी सुरू केली आहे. त्यानुषंगाने मृतकांच्या नातेवाइकांचे समुपदेशनही करण्यात येत आहे. मृत पावलेल्या २५ जणांपैकी १८ मृतकांचे नातेवाईक बुलढाण्यात दाखल झाले आहेत.

या सर्वांचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील वनस्टॉप सेंटरमधील सभागृहात समुपदेशन करण्यात येणार आहे. येथे आ. डॉ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड, स्वत: जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड आणि अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित आहेत. दुसरीकडे डीएनए चाचणीसाठी पुणे येथील सहा जणांचे पथक जिल्ह्यात दाखल झाले असून प्रारंभी या पथकाने सिंदखेड राजातील पिंपळखुटा येथील घटनास्थळाचे नमुने घेतले आहेत. दरम्यान, हे पथक सायंकाळ दरम्यान बुलढाण्यात दाखल झाले आहे.

डीएनए चाचणीच्या अहवालासाठी लागतील चार दिवस

डीएनए चाचणीचा अहवाल येण्यासाठी किमान चार दिवस लागण्याची शक्यता आहे. तोवर सर्व पार्थिव हे शवगृहातील कोल्डस्टोअरेज तसेच शीत शवपेट्यांमध्ये ठेवावे लागणार आहेत. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन केलेले आहे. दरम्यान, मृतदेहाच्या छातीचे स्टरमन (छातीचे हाड) तसेच दाताचे नमुने घ्यावे लागणार आहेत. सोबतच मृत व्यक्तीचे आईवडील किंवा त्यांच्या अत्यंत निकटवर्तीयाच्या रक्ताचे नमुने यात गोळा करावे लागणार आहेत. डीएनए चाचणीही प्रॉबेबिलीटीवर अवलंबून असते. त्यामुळे २५ मृतदेहांचे स्टरमन, तसेच दाताच्या नमुन्यांची व जवळच्या नातेवाइकाच्या रक्ताची प्रत्येकी २७ वेळा तपासणी केली जाईल. त्यानंतर डीएनए जुळविण्यास मदत होणार आहे. ही प्रक्रिया किचकट असून एका रक्तनमुन्याची २५ मृतदेहांच्या स्टरमनसोबत तपासणी करावी लागणार आहे. त्यामुळे ही किचकट प्रक्रिया पूर्ण होण्यास चार दिवसांचा अवधी लागू शकतो. त्यामुळे सर्व मृतदेह हे जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवगृहात आणि सामाजिक संस्थांकडून आणलेल्या शीत शवपेटीत ठेवावे लागणार आहेत.सामूहिक अंत्यसंस्कारासाठी प्रयत्न

जिल्हा सामान्य रुग्णालयातील एकंदरीत परिस्थिती पाहता मृतकांच्या नातेवाइकांचे या सर्व प्रक्रियेसाठी समुपदेशन करण्यात येत असून जिल्हाधिकारी स्वत: त्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयत ठाण मांडून बसलेले आहेत. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सामूहिक अंत्यसंस्कारासंदर्भाने निर्णय झाला नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!