शेंदुरवादा शिवारात शेतवस्तीवर सशस्त्र दरोडा, अज्ञात दरोडेखोरांच्या मारहाणीत एक ठार, एक जखमी, दागदागिने लंपास.शेतक-यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे


गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील शेंदुरवादा शिवारात अज्ञात दरोडेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने दोघांना मारहाण करत महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने ओरबाडून फरार झाले. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या ४० वर्षीय महिलेवर घाटीत उपचार सुरू आहे. ही घटना शनिवारी २७ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.


पोलिसांकडून मिळालेली माहिती नुसार नारायण पंढरिनाथ निकम वय ७५ वर्ष व त्यांची सून अन्नपुर्णा नानासाहेब निकम वय ४० वर्ष हे गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा येथील गावाजवळील शेतवस्तीवर राहतात.शुक्रवारी २६ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे रात्रीचे जेवण केल्यानंतर नारायण निकम हे घरासमोर बाजेवर झोपले हेाते. तर अन्नपूर्णाबाई निकम या घरात झोपलेल्या होत्या. रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास बाहेर झोपलेल्या नारायण निकम यांना दरोडेखोरांनी तिष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केले व घराचा दरवाजा वाजवला यामुळे अन्नपूर्णाबाईने कोण आहे असे विचारले असता कोणीही प्रतिसाद दिला नाही. पुन्हा जास्त दरवाजा वाजु लागल्याने दरवाजा उघडला असता अन्नपूर्णा निकम यांच्या गळ्यावर अचानक काहीतरी मारले व दोन्ही कानातील सोन्याचे फुले ओरबडुन तोडले. व गळ्यातील सोन्याचे काळे मणी व सोन्याचे ३० मणी असलेली पोत तोडुन पळाले. त्यानंतर आरडाओरड करुन त्या घराबाहेर आल्या असता त्यांचे सासरे नारायण निकम हे रक्ताच्या थारोळ्यात जखमी व बेशुध्द अवस्थेत पडलेले दिसले.
अन्नपूर्णा बाईने घरापासुन काही अंतरावर राहणा-या चुलत पुतण्या गणेश निकम यांचे घरी पळत जावुन आपबीती सांगितली. त्यानंतर रामेश्वर निकम व नातेवाईकांनी दोघांनाही घाटीत दाखल केले असता नारायण निकम यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून सांगितले तर अन्नपूर्णाबाई निकम यांच्यावर घाठीत उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरवाजा तोडण्याचा प्रयत्न –
घराबाहेर झोपलेल्या नारायण निकम यांना मारहाण करून गंभीर जखमी केल्यानंतर ते बेशुद्ध पडले. त्यानंतर दरोडेखोरांनी घराचा दरवाजा ठोठावला. तो दरवाजा उघडत नसल्यामुळे दरोडेखोरांनी कु-हाडी सारख्या हत्याराने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.

घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा –
शेंदूरवादा येथे दरोडा पडला असून या घटनेत एक ठार तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने हे फौजफाट्यासह घटनास्थळी धावले. दरम्यान पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, गुन्हे शाखेचे संदीप गुरुमे यांच्यासह स्वानपथकानेही घटनास्थळी धाव घेत दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!