वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत गंगापूर – खुलताबाद नगरपरिषदांना तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्याला यश.

गंगापूर : प्रतिनिधी,
शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण नगर विकास योजनेअंतर्गत खुल्ताबाद नगरपरिषदेस रु.८.९५ कोटी तर गंगापूर नगरपरिषद जि. छत्रपती संभाजीनगर करिता रक्कम रु.१६.०५ कोटी अशा एकुण तब्बल रु.२५.०० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामासाठी आमदार प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे आता गंगापूर आणि खुलताबाद येथील नगर परिषदेच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांच्या सोयी सुविधांमध्ये भर पडणार आहे.

आमदार प्रशांत बंब यांच्या मतदारसंघात गंगापूर आणि खुलताबाद अशा दोन नारपरिषदा आहेत.या दोन्ही नगर परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना भौतिक सोयी, सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ते शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठपुरावा करत होते. अखेर आज अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बंब यांनी दोन्ही तालुक्यातील नागरिकांच्या भौतिक सोयी, सुविधांसाठी तब्बल २५ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळवली आहे.

सदर प्रकल्पाअंतर्गतची कामे ही सार्वजनिक मालकीच्या ठिकाणीच करण्यात येणार असून त्यात गल्लोगल्ली सिमेंट व डांबरी रस्ते, पेव्हर ब्लॉक,नाली, स्मारके सुशोभीकरण, सभागृह, व्यायाम शाळा बांधकाम, स्मशानभुमी सुशोभीकरण, सभामंडप, खुल्या जागी गार्डन तयार करणे आदी कामे करण्यात येणार असून त्यामुळे सर्वसमावेशक नागरिकांच्या प्राथमिक सोयी सुविधांमध्ये भर पडणार आहे.

प्रतिक्रिया :
माझ्या मतदारसंघात गंगापूर आणि खुलताबाद अशा दोन नगर परिषदा येतात. नगर परिषद हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना डांबरी तसेच सिमेंट रस्ते, घरासमोर गल्लीत पेव्हर ब्लॉक, नाली, गार्डन, अशा भौतिक सोयी, सुविधा
मिळाव्यात यासाठी मी नगर विकास विभाग व मुख्यमंत्री, आणि या खात्याचे मंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. त्यांनी सदर निधीला मंजुरी दिली. यामुळे मतदारसंघात नागपरिषद हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना लवकरच सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.
आमदार प्रशांत बंब.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!