बनावट नंबर टाकून ट्रक वापरणा-या दोघाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, पाच लाखाचा मुद्देमाल जप्त


गंगापूर (प्रतिनिधी) – ट्रकच्या चेसीस नंबर मध्ये खाडाखोड करुन ट्रक रस्त्यावर चालवून शासनाची फसवणूक करणाऱ्या दोघांना वाळुज एमआयडीसी पोलिसांनी पकडुन त्यांच्या ताब्यातुन ट्रक व अंदाजे २० हजार लिटर क्षमता असलेली लोखंडी टाकी तसेच कागदपत्रे असा ५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई तीसगाव चौकात रविवारी २८ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास करण्यात आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की वाळुज एमआयडीसी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, पोहेकॉ.विनोद नितनवरे, धिरज काबलिये, पोकॉ.सुरेश भिसे आदींचे पथक रविवारी रोजी गस्त घालत होते. तीसगाव चौकात दुपारी २.३० वाजेच्या सुमारास त्यांना एक ट्रक संशयास्पदरित्या उभा दिसला. गस्तीवरील पथकाने ट्रकचालक मच्छिंद्र महादु नागरे (४६), रा.तपोवन निंभोरा, ता.कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर याच्याकडे मिळून आलेल्या ट्रक क्रमांक एम एच १६,क्यु-४६७४ च्या कागदपत्राची मागणी केली असता त्याने कागदपत्रे नसल्याचे सांगितले. हा संशयास्पद प्रकार असल्याचे लक्षात येताच पोलीस पथकाने ट्रक पोलीस ठाण्यात आणुन चालक मच्छिंद्र नागरे यास ट्रकची कागदपत्रे घेऊन हजर राहण्यास सांगितले.
फॉन्ड व पंच यामध्ये तफावत –
यानंतर ट्रकचालकाने पोलीस ठाण्यात येऊन वर्षभरापुर्वी हा ट्रक सुभाष भिमा गायकवाड रा.प्रसादनगर, देवळाली प्रवरा, ता.राहुरी याच्याकडून १०० रुपयाच्या शपथपत्रावर खरेदी केल्याचे सांगत शपथपत्र दाखविले. त्यात तफावत आढळल्याने पोलीसांनी ट्रक विक्री करणाऱ्या सुभाष गायकवाड यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने ट्रकचे आरसी बुक पोलीसांना दिले. आरसी बुकवरुन या ट्रकचा क्रमांक व चेसीस नंबर तफावत आढळल्याने ट्रक चोरीचा असल्याचा संशय बळावला.
परिवहन विभागाच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल –
तीसगाव येथे पकडलेल्या या ट्रकची कागदपत्रे पोलिसांनी तपासणीसाठी परिवहन विभागाकडे दिली होती. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ट्रकच्या चेसीस व इंजिनची पडताळणी केली असता त्यांना या ट्रकचा चेसीस क्रमांक हा टाटा कंपनीने दिलेल्या फाॅन्ड व पंचप्रमाणे आढळून आला नाही. इंजिन नंबर प्लेट व पंचमध्ये तफावत असल्याचा अहवाल पोलीसांना दिला. यामुळे हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीसांनी ट्रक खरेदी करणारा मच्छिंद्र नागरे व विक्री करणारा सुभाष गायकवाड या दोघाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. घाडगे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!