धक्कादायक पोलिसांने पोलीसांच्या तिजोरीवरच मारला डल्ला पोलीस ठाण्यातुन तिन लाख लांबविले.


तक्रारदार पोलीस अन् आरोपीही पोलिसच.

पोलीस निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून सहायक फौजदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) अनेकदा चोरी झाल्यावर किंवा आपली फसवणूक झाल्यावर आपण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करत असतो. मात्र, छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी पोलिस ठाण्यात आगळावेगळा प्रकार समोर आला असून, तक्रारदार पोलीस अन् आरोपीही पोलिसच आहे. विशेष म्हणजे चोरीही पोलीस ठाण्यातच झाली आहे. या घटनेनंतर पोलीस दलात खळबळ उडाली असून, पोलीस निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून सहायक फौजदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. राजेंद्र नारायण होळकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, “रामदास संताराम गायकवाड (५५) हे पोलीस स्टेशन छावणी येथे नेमनुकीस असुन, पोलीस ठाण्यातील मोहरील ड्युटी करीत असतात. मोहरील पदाचा गैरवापर करुन तत्कालीन पोलीस निरीक्षक यांचा विश्वास संपादन करुन ३० एप्रिल २०२१ रोजी ३ लाख ४ हजार ८१९ रुपये शासकीय बँक खात्यामधुन रोखीने काढुन घेतले. त्याची शासकीय अभिलेखावर नोंद न घेता काढलेल्या रक्कमेचा हिशोब ठेवला नाही. तसेच शासकीय अभिलेखामध्ये ओव्हर रायटिंग करुन शासनाची दिशाभुल करुन फसवणुक केली. वरील रक्कम ही स्वत:च्या फायद्यासाठी वापरुन रकमेचा अपहार केल्याचे पोलिस निरीक्षक होळकर यांनी वार्षिक अहवाल तपासला असता त्यांना त्यामध्ये अनियमितता आढळून आली. त्यांनी अधिक माहिती घेतली असता ३ लाख ४ हजार ८१९ रुपये शासकीय बँक खात्यामधुन रोखीने काढून तो कुठे वापरण्यात आला याची महिती उपलब्ध नव्हती. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.
यावरून पोलिस निरीक्षक होळकर यांच्या फिर्यादीवरून सहायक फौजदार रामदास संताराम गायकवाड (वय 55 वर्षे) यांच्या विरोधात विरोधात कलम ४२०, ४०६, ४०९ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस दलात चर्चेला उधाण…

पोलीस ठाण्यात रोज अनेक फसवणुकीचे प्रकरण येत असतात, मात्र चक्क पोलीस दलाचीच फसवणूक केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात समोर आला आहे. विशेष म्हणजे फसवणूक करणारा देखील पोलीस कर्मचारीच आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होताच शहरातील पोलीस दलात याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. स्वतः च्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर करुन ३ लाख ४ हजार ८१९ रुपये शासकीय बँक खात्यामधुन रोखीने काढुन गायकवाड यांनी गैरप्रकार केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!