आर्त आक्रोश नि शोककळा! बेपत्ता कुटुंबीयांचा शोध लागत नसल्याने अनेक जण बेचैन ईर्शाळवाडी रायगड दरड दुर्घटना १६ जनांचे मृतदेह आढळले

आर्त आक्रोश नि शोककळा! बेपत्ता कुटुंबीयांचा शोध लागत नसल्याने अनेक जण बेचैन

या दुर्घटनेची माहिती मिळताच सकाळी इरशाळवाडीतील रहिवाशांच्या नातलगांनी वाडीच्या दिशेने धाव घेतली.

ईर्शाळगड रायगड दरड दुर्घटना १६ जनांचे मृतदेह आढळले

पाणावलेल्या डोळय़ांनी जिवाभावाची माणसे भेटतील याकडे आस अतिवृष्टी, दाट धुक्यामुळे मदतकार्यात अडचणी; दुर्गम भागामुळे यांत्रिक मदत पोहोचणेही अशक्य 

अलिबाग : दरड दुर्घटनेनंतर इरशाळवाडीवर शोककळा पसरली आहे. बेपत्ता असलेल्या कुटुंबीयांचा शोध लागत नसल्याने आणि काहीच माहिती मिळत नसल्याने या दुर्घटनेत बचावलेल्यांचा आणि नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. दुर्घटनेत बचावलेल्या महिला धाय मोकलून रडत होत्या, तर तरुण मुले पाणावलेल्या डोळय़ांनी हताशपणे जिवाभावाची माणसे बचावलीत का याकडे आस लावून बसले होते. परिस्थितीपुढे सारेच हतबल असल्याची जाणीव यानिमित्ताने होत होती.

डोंगरकुशीत वसलेल्या इरशाळवाडीसाठी बुधवारची रात्र काळरात्र ठरली. निसर्गरम्य परिसरातील या टुमदार वाडीचे अस्तित्वच दरडीने नष्ट केले. ४० उंबरठय़ांची ही वाडी मातीच्या ढिगाऱ्यात लुप्त झाली. अनेकांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. या दुर्घटनेची माहिती मिळताच सकाळी इरशाळवाडीतील रहिवाशांच्या नातलगांनी वाडीच्या दिशेने धाव घेतली. आपल्या जिवलगांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण मातीच्या ढिगाऱ्यापलीकडे वाडीवर काहीच शिल्लक राहिले नव्हते.

बेपत्ता झालेल्यांचे नातलग आक्रोश

करत होते. अतिवृष्टी आणि दाट धुक्यामुळे मदत व बचावकार्यात अडचणी येत होत्या. दुर्गम ठिकाण असल्याने यांत्रिक मदत पोहोचवणे शक्य होताना दिसत नव्हते. त्यामुळे नातलगांचा त्रागा होत होता. परिस्थिती पुढे काहीच करू शकत नाही याची जाणीव त्यांना होत होती. प्रशासनाकडून त्यांना माहिती देणारे कोणीच उपलब्ध नव्हते. त्यामुळेही अनेक जण टाहो फोडताना दिसत होते.

दुर्घटनेतील मृत व्यक्ती

रमेश हरी भवर (२६), जयश्री रमेश भवर (२२), विनोद भगवान भवर (४), जिजा भगवान भवर (३६), अंबी बाळू पारधी (४५), बाळू नामा पारधी (५२), सुमित भास्कर पारधी (३), सुदाम तुकाराम पारधी (१८), दामा भवर (४०), चंद्रकांत किसन वाघ (१८), राधी रामा भवर (३७), बाळी नामा भुतांब्रा (७०)

*जखमी व्यक्ती*

प्रवीण पांडुरंग पारधी (२१), यशवंत राघो डोरे (३७), भगवान हरी भवर (२५), मनीषा यशवंत डोरे (३५), रामी रामू पारधी (७७), कमली महादू पारधी (५०)

कुटुंबातील मुले आश्रमशाळेत

स्वातंत्र्याला ७५ वर्षे लोटली तरी विकासाची गंगा या वाडीपर्यंत पोहोचलीच नाही. त्यामुळे वीज, स्वच्छ पाणी, आरोग्य या प्राथमिक सुविधांपासून वाडी वंचित राहिली. काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन वाडीवर सौरऊर्जेवरील दिव्यांची व्यवस्था केली आणि वस्ती उजळली. जिल्हा परिषदेने इरशाळवाडीत प्राथमिक शाळा सुरू केली. अभ्यासासाठी पोषक वातावरण नसल्याने बहुसंख्य ग्रामस्थांची मुले खोपोलीजवळील उंबर आणि पनवेलजवळील चिखलोली येथील आदिवासी आश्रमशाळेत शिकतात.

गड की माची?

चौक-मानिवलीजवळचा हा गड इरशाळगड नावाने ओळखला जातो. मात्र, हे टेहळणीचे एक ठिकाण आहे. पूर्वीच्या काळी चौक ही मोठी व्यापारी बाजारपेठ होती. या बाजारपेठेच्या संरक्षणासाठी आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवता यावे, याकरिता त्याची उभारणी झाल्याचे सांगतात. गडावर इरशाळ देवीचे मंदिर आहे. त्याव्यतिरिक्त दगडात कोरलेल्या पाण्याच्या चार टाक्या गडावर आहेत. पूर्वी गडावर वस्तीही असावी, असे म्हणतात.  तेथे शिबंदीची व्यवस्था असणार. परंतु तटबंदीची कुठलीही निशाणी तेथे दृष्टीस पडत नाही. या गडावरील मोठी कपार गिर्यारोहकांचे मुख्य आकर्षण आहे, अशी माहिती ज्येष्ठ गिर्यारोहक आप्पा धनंजय मदने यांनी दिली.

भाजी विकायला गेली म्हणून जीव वाचला..

अलिबाग : शेतीत पिकलेली भाजी पनवेल बाजारात विक्रीसाठी गेली म्हणून तारी पारधी या महिलेचा जीव वाचला. इरशाळवाडीच्या दरड दुर्घटनेत तिने आपले संपूर्ण कुटूंबच गमावले. तारी पारधी आणि तिचे कुटूंब गेल्या ५० वर्षांपासून इरशाळवाडी येथे वास्तव्यात होते. शेती करून तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. शेतात पिकवलेला भाजीपाला पनवेल येथे नेऊन विकायची हा तारी पारधीचा नित्यक्रम होता. नेहमीप्रमाणे भाजीपाला घेऊ ती पनवेल येथे गेली होती. मात्र पावसात अडकून पडल्याने ती पनवेल येथेच नातेवाईकांकडे मुक्कामाला राहिली होती. पण सकाळी जेव्हा वाडीवर परतली तेव्हा तिची वाडी, तिचे घर आणि तिचे कुटुंबच दरडीखाली उद्ध्वस्त झाले होते. दरड दुर्घटनेत तिचा पती पांडू पारधी आणि मुलगा अबोस बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे आता जगू तरी कोणासाठी असे म्हणत तारी पारधी टाहो फोडला.

मुंबई महापालिकेचे पथक रवाना

इरशाळवाडीतीलदुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बचाव कार्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे पथक रवाना झाले. या ठिकाणी पक्का रस्ता नसल्यामुळे वाहनांना वाट निर्माण करून देणारे एक विशिष्ट यंत्र महापालिकेच्या जी उत्तर विभागाने पाठवले आहे.  घटनास्थळी पोहोचण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. या दुर्गम भागात ढिगारा उपासण्यासाठी जेसीबी किंवा अन्य वाहने पोहोचू शकत नाहीत. महापालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्घटनास्थळी ‘बॉब कॅट’ हे विशिष्ट यंत्र पाठवण्यात आले आहे. या यंत्राद्वारे वाहन जाण्यासाठी रस्ता तयार करणे शक्य होते.

एमजीएम कामोठे येथील दोन रुग्ण सुरक्षित

पनवेल : खालापूर येथील इरशाळवाडी दुर्घटनेतील दोन रुग्ण कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या या दोघांची प्रकृती व्यवस्थित आहे. ३७ वर्षीय यशवंत मोरे आणि २१ वर्षीय प्रवीण पारधी अशी त्यांची नावे आहेत. यातील एकाला छातीला आणि एकाला ढोपराला मार लागला होता. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी एक्स-रे केल्यानंतर कोठेही फ्रॅक्चर नसल्याची माहिती पनवेल पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली.

नवी मुंबईतील वैद्यकीय पथक रवाना इरशाळवाडी दुर्घटनेनंतर अवघ्या दोन-अडीच तासांत नवी मुंबई मनपाचे वैद्यकीय आणि अग्निशमन पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी तात्काळ आपली सेवा सुरू केली. नेरुळ आणि ऐरोली येथील रुग्णालयांच्या पथकांचा यात समावेश होता. नेरुळ आणि वाशी रुग्णालयातील प्रत्येकी दोन पथके तर ऐरोली रुग्णालयाचे एक पथक यात होते. तसेच पाच रुग्णवाहिका, डॉक्टरांची पाच पथके ज्यात २ अस्थिव्यंग तज्ज्ञ, ३ डॉक्टर, आणि नर्सिग स्टाफ व मदतनीस यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!