जाणूनबुजून शेतकऱ्यांची अडवणूक व फसवणूक करणाऱ्या कृषि सेवा दुकादारांवर नियंत्रण ठेवुन, त्यांचेवर निर्बंध आणून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी – आमदार प्रशांत बंब

गंगापूर प्रतिनिधी : गंगापूर खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना आवश्यकते नुसार नामांकित कंपन्यांची बि-बियाणे व खते, औषधीं संबंधित कृषि सेवा दुकानदारांकडून मिळत नसणे, तसेच शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा चढ्या आणि वाढीव भावाने व बोगस बि-बियाणे विक्री करुन, जाणूनबुजून शेतकऱ्यांची अडवणूक करत असलेल्या कृषि सेवा दुकादारांवर नियंत्रण ठेवुन, तात्काळ त्यांचेवर निर्बंध आणून दोषी आढळणाऱ्या दुकानांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असे पत्र आमदार बंब यांनी जिहा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पाठवले आहे.

पत्रात राज्यासह मराठवाड्यात सद्यस्थितीत नुकतेचे मान्सुनचे आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पुर्व तयारी सुरु केली आहे. पिकांची पेरणी, लावगवड करणेकामी; ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची बि-बियाणे, खते, औषधी घेण्याची लगबग चालु आहे. परंतू, शासनाने ठरवून दिलेल्या भावापेक्षा चढ्या भावाने, व बोगस बियाणे विक्रीचा प्रकार सध्या कृषि सेवा दुकानदार करत असल्याचे आढळून आले आहे.

माझ्या मतदारसंघातील गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील बि-बियाणे, रासायनिक खते, औषधी विक्री करणारे कृषि सेवा दुकाने मोठ्या प्रमाणांवर आहेत. काही दुकानदार इमाने-इतबारे शेतकऱ्यांना रास्त दराने व नामांकित कंपन्यांचीच बि-बियाणे, खते, औषधी विक्री करत आहेत.
परंतू काही कृषि सेवा दुकानदारांकडून शासनाने ठरवून दिलेल्या भावापेक्षा चढ्या भावाने शेतकऱ्यांना मागणी केलेल्या नामांकित कंपन्यांचे बि-बियाणे, खते, औषधी विक्री केली जात आहे. तसेच बोगस बि-बियाणे शेतकऱ्यांना विक्री केली जात आहेत. शेतकऱ्यांकडून नामांकित कंपन्यांची बि-बियाण्यांची मागणी केली जाते, परंतू त्या बियाण्यांचा शेतकऱ्यांना वाढीव भाव सांगून, एक बॅग अथवा एक पिशवी घेता येणार नाही, तर वाढीव म्हणजे दोन पेक्षा अधिक बॅग किंवा घ्याव्या लागतील, असे अडवणूकीचे प्रकार दुकानदारांकडून सुरु आहेत.

कृषि सेवा दुकानदारांस ज्या कंपनी च्या बि-बियाण्यावर भरमसाठ नफा मिळेल, त्याच कंपनीचे बियाणे घेण्यास शेतकऱ्यांना जाणूबुजून भाग पाडले जात आहे. यावर आपल्या शासकीय अधिकाऱ्यांचे कोणतेही नियंत्रण अथवा निर्बंध पाहावयास मिळत नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण तयार झाले असुन, त्याबाबत प्रचंड शेतकऱ्यांच्या तक्रारी माझ्या संपर्क कार्यालयास येत आहे. तर दुसरीकडे नामांकित कंपन्यांचे बि-बियाणे शासनाने दिलेल्या भावापेक्षा चढ्या भावाने/दराने व बोगस बि-बियाणे संबंधित कृषि सेवा दुकानदार विक्री करत असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्यामुळे पाहिजे त्या कंपनीचे बियाणे मिळत नसल्याने, लागवडीला उशीर होईल ही भिती देखील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

सदर बाब अतिशय गंभीर असुन, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना बोगस बि-बियाणे घेण्यास संबंधित कृषि दुकानदारांकडून प्रवृत्त केले जात असल्याचे या सर्व प्रकारावरुन दिसते. सदरील गैरप्रकारावर तात्काळ आपल्या कार्यालयाकडून थांबविण्याची कार्यवाही करणे अत्यावश्यक आहे.

करिता, या प्रकरणी तात्काळ निर्बंध लावणेसाठी; व शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार पाहिजे ते नामांकित कंपनीचे बि-बियाणे, खते, औषधी मिळणेसाठी संबंधित कृषि सेवा दुकानदारांना बंधनकारक करावे. याविरुध्द जो कृषि दुकानदार शेतकऱ्यांना अडवणुक करुन बोगस बि-बियाणे, खते, औषधी घेण्यास जाणूनबुजून प्रवृत्त करत असतील, अशा दुकानांचे परवाने तात्काळ जप्त करुन दुकान सिल करण्याचे निर्णय घ्यावे.

तसेच याप्रकरणी तालुक्यांतील सर्व कृषि सेवा दुकानदारांवर नियंत्रण ठेवणेकामी तालुक्यांतील तालुका कृषि अधिकारी व त्यांचे अधिनस्त कृषि सेवकांना मुख्यालयी राहणेबाबत बंधनकारक करावे. नसता याप्रकरणी होत असलेले गैरप्रकार बंद न झाल्यास; येत्या विधानसभा अधिवेशनामध्ये संबंधित सर्व अधिकाऱ्यांविषयी चर्चा उपस्थिती करेल, याची नोंद घेण्याचा ईशारा देखीव बंब यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!