फसवणुक झालेल्या पती-पत्नीला फाशी घेण्याचा उपनिरीक्षकांचा अजब सल्ला.. एमआयडीसी वाळूज ठाण्यातील धक्कादायक प्रकार: ३ लाखाची फसवणुक झालेल्या पती-पत्नीला ठाण्यातुन हाकलले

फसवणुक झालेल्या पती-पत्नीला फाशी घेण्याचा उपनिरीक्षकांचा अजब सल्ला
एमआयडीसी वाळूज ठाण्यातील धक्कादायक प्रकार: ३ लाखाची फसवणुक झालेल्या पती-पत्नीला ठाण्यातुन हाकलले

वाळूज महानगर :- एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिलेच्या एटीएमची अदला-बदल करुन भामट्याने जवळपास ३ लाखाला गंडा घातल्याची घटना दिड महिन्यापुर्वी रांजणगावात घडली. कष्टाचे पैसे भामट्याने लांबविल्याने तक्रार दिलेल्या दाम्पत्यांला पोलिस टोलवा-टोलवी करीत असल्याने न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न या दाम्पत्याला पडला आहे.
चौत्रा अंकुश रेखाडगेवाड(रा.रांजणगाव) या दिड महिन्यापुर्वी बहिण मिरा परसवाड यांना सोबत घेऊन गावातील सावता मंदिराजवळ असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. या एटीएम केंद्रात असलेल्या एका ४० वर्षीय भामट्याने पैसे काढुन देण्याचा बहाणा करीत चौत्रा रेखाडगेवाड यांच्याकडून एमटीएम कार्ड घेऊन त्यांना १० हजार रुपये काढुन दिले. यानंतर हातचलाखी करीत त्या भामट्याने स्वत:जवळी एटीएम कार्ड चौत्रा रेखाडगेवाड यांना देऊन त्यांचे एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवुन घेतले. दरम्यान, आठवडाभरानंतर चौत्रा रेखाडगेवाड या परभणी येथे गावी गेल्यानंतर एटीएम कार्ड मधुन पैसे काढण्यासाठी गेल्या असता मात्र पैसे निघत नसल्याने त्यांच्या सोबत असलेल्या बहिणीने या एटीएम कार्डची पाहणी केली हे एटीएम कार्ड नरवडे यांच्या नावाचे असल्याचे त्यांना दिसून आले.


भामट्याने परस्पर काढले तीन लाख रुपये
हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच चौत्रा रेखाडगेवार व त्यांचे पती अंकुश हे दोघे बँकेत गेले असता त्यांच्या खात्यातील २ लाख ९० हजार रुपये परस्पर कपात झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे भामट्यांने एटीएमची अदला-बदल केल्यानंतर आठवडाभरात शहरातील वेग-वेगळ्या एटीएम केंद्रातुन पैसे काढले तसेच पुण्यातही ऑनलाईनपध्दतीने काही वस्तु खरेदी केल्याचे या दाम्पत्याला समजले.


दिड महिन्यापासून पोलिसांची टोलवा-टोलवी
काबाड-कष्ट करुन पै-पै जमा केलेले पैसे भामट्याने परस्पर हडप केल्याने दिड महिन्यापुर्वी चौत्रा रेखाडगेवार यांनी पतीला सोबत घेऊन एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात व पोलिस आयुक्तालयकडग तक्रार दिली आहे. मात्र पोलिसाकडून या दाम्प्त्यास टोलवा-टोलवी केली जात असल्याने या दाम्प्यास आश्रु अनावर झाले होते.
उपनिरीक्षक म्हणाले पोलिस ठाण्यातच फाशी घ्या
गुरुवारी २४ ऑगस्ट रोजी चौत्रा रेखाडगेवार व त्यांचे पती अंकुश हे दोघे एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी अंकुश रेखाडगेवार यांनी साहेब मी मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले पैसे भामट्याने हडप केल्याने माझे पैसे मिळवून द्या माझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, अशी विनवणी करीत आता न्याय कुणाकडे मागावा असा प्रश्न उपस्थित केला. तक्रारदारच्या या उत्तराने पारा चढलेल्या उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी तक्रारदार अंकुश रेखाडगेवार यास फैलावर घेत तु आत्महत्येची धमकी देतो काय, असे म्हणून पोलिस ठाण्यातच आत्महत्या कर असा अजब सल्ला दिला. उपनिरीक्षक शिंदे यांच्या या सल्ल्यामुळे डिबी रुममध्ये असलेल्या काही महिला व नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर या दाम्पत्याने अनेकदा विनवणी करुनही उपनिरीक्षक शिंदे यांनी तुमचे काम करीत नाही, माझी कुठेही तक्रार करा असे म्हणत त्यांना ठाण्यातुन अक्षरश: हाकलुन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!