धक्कादायक -आधी बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी नंतर दहा कोटींची खंडणी मागुन दहा लाखांची खंडणी घेताना नाशिक येथील कृषी अधिकारी तथा स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या उपासीकेला अटक

नाशिक (प्रतिनिधी) बलात्काराचे मॉर्फ व्हिडीओ करून व्हायरल करू, असं धमकवत अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ न्यासाच्या विश्वस्त मंडळाच्या सदस्यांकडून विस कोटींची मागणी करुन दहा लाखांची खंडणी घेताना स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या उपासीकेला रंगेहाथ पकडले

 नाशिकमध्ये समोर आलेल्या एका घटनेमुळे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेले श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्र चर्चेचा विषय ठरले आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दिंडोरीच्या स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रात सक्रीय सहभागी असलेले तसेच अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ या न्यासाच्या विश्वस्त मंडळावर सदस्य असलेल्या निंबा शिरसाट यांच्याकडून केंद्राच्या उपासीका सारिखा सोनवणे यांनी १० कोटी ५० लाखांची खंडणी मागितली होती. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात तिच्या मुलाचाही सहभाग असल्यानं या दोघांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात खंडणीसह माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, १० लाखांची रोख रक्कम स्वीकारताना त्यांना बेड्याही ठोकण्यात आल्या आहेत. संशयित आरोपी सारिका सोनवणे या स्वतः कृषी अधिकारी देखील आहेत.  
२०१४-१५ साली नाशिकच्या सिडको परिसरातील अनेक स्वामी समर्थ केंद्रांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असल्याने तक्रारदार निंबा शिरसाट आणि सारिका सोनवणे यांची चांगली ओळख झाली होती. जानेवारी २०२२ मध्ये आरोपी आणि तिचा मुलगा मोहित सोनवणे यांनी शिरसाट यांना माझा मुलगा आयटी एक्सपर्ट असून आम्हाला तुम्ही पैसे न दिल्यास तुमचे मॉर्फ व्हिडीओ करून व्हायरल करू, असं धमकवत त्यानंतर वेळोवेळी व्हॉट्सअँप कॉल करून पैसे मागण्यास सुरुवात केली.
जानेवारी २०२३ मध्ये आरोपी यांनी शिरसाट यांना प्रशांतनगरच्या स्वामी समर्थ केंद्रात भेटून आरोपीचे मोबाईलमधील व्हिडीओ शिरसाट यांना दाखवून २० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली, पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली. त्यानंतर घाबरलेल्या शिरसाट यांनी ५० लाख रुपये नोव्हेंबर २०२३ मध्ये देऊ करताच सारिका बापुराव सोनवणे यांनी मोबाईल मधील व्हिडीओ डिलीट केल्याचं दाखवलं. मात्र पुन्हा आरोपी सोनवणे यांनी १० कोटी ५० लाखांची मागणी करत गुन्हा दाखल करण्याची तसेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देताच शिरसाट यांनी कंटाळत पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली आणि त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत १० लाखांची रोख रक्कम स्वीकारताना आईसह मुलाला अटक केली. त्यांच्या घरातून १० लाख रुपये, एक लॅपटॉप आणि तिन ॲपल फोन जप्त करण्यात आले आहे. सारिका सोनवणे या महिलेनं संकल्पसिध्दी कंपनी काढून पैसे दामदुप्पट करण्याचं आमिष दाखवत काही सेवेकऱ्यांकडून पैसे गोळा केले होते, पैसे परत करू शकत नसल्यानं मी त्यांना 20 लाख रुपयांची मदत केली होती, असंही शिरसाट यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. आजपर्यंत वेगवेगळ्या कारणास्तव तब्बल एक कोटी पाच लाख रुपये सारिका सोनवणे यांनी शिरसाट यांच्याकडून घेतले आहेत. एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणानंतर खळबळ उडाली असून स्वामी समर्थांच्या भाविकांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे. हे प्रकरण नक्की काय आहे? तक्रारदारानं आत्तापर्यंत एक कोटींहून अधिकची एवढी रक्कम का देऊ केली? या सर्व बाजूने पोलीस खोलवर तपास करणार का? तसेच गुरुमाऊली प. पू. अण्णासाहेब मोरे या प्रकरणात लक्ष घालणार का? हेच आता बघणं महत्वाचं ठरणार आहे.
पोलिसांनी या महिलेचे लॅपटॉप, मोबाईल व इतर साहित्य जप्त केले असून ज्या व्हिडिओच्या आधारे त्रास दिला जात होता त्याची सत्यता देखील तपासली जाणार आहे असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!