धक्कादायक..मनपाने अतिक्रमण पाडले, आसरा न राहिल्याने संतापात महिलेने पेटवून घेत जीवन संपविले छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील अतिक्रमणावर कारवाईनंतर उचलले महिलेने टोकाचे पाऊल

मनपाने अतिक्रमण पाडले, आसरा न राहिल्याने संतापात महिलेने पेटवून घेत जीवन *संपविले*
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील अतिक्रमणावर कारवाईनंतर उचलले महिलेने टोकाचे पाऊल*

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समीक्षा खंडारे या ३५ वर्षीय महिलेने मंगळवारी दुपारी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. स्काऊट ॲण्ड गाईड कार्यालयाच्या संरक्षण भिंतीलगत निवारा करण्यासाठी सुरू केलेले कच्चे बांधकाम महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने काढल्यामुळे संतप्त होऊन त्या महिलेने पेटवून घेतले. यात गंभीररीत्या भाजलेल्या महिलेचा उपचारदरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. 

कारवाईपूर्वी त्या महिलेला अतिक्रमण हटाव पथकाने उचलून नेत दुसरीकडे सोडले. त्यानंतर ती पुन्हा तेथे आल्यावर मनपाने तिच्या वस्तू उचलून नेल्याने  तिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. हा भयंकर प्रकार पाहून प्रत्यक्षदर्शींचा थरकाप उडाला.दरम्यान, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या सूचनेनुसार निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी या घटनेप्रकरणी पूर्ण माहिती गृह शाखेकडून घेतली. या महिलेची कुठलीही तक्रार प्रशासनाकडे आलेली नाही. उलट त्या महिलेविरोधात काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दगडफेकीच्या तक्रारी केल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अपंग व्यक्तीचे उपोषण सुरू असून, त्याबाबत महापालिकेला पत्र देण्यात आले आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी विधाते यांनी सांगितले. सिटी चौक पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी घटनास्थळाची पाहणी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!