छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीच्या दारातच अंत्यसंस्कार

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीच्या दारातच अंत्यसंस्कार

माहेरातून संताप व्यक्त : निमगावमधील घटना

सोलापूर (प्रतिनिधी) माहेराहून टीव्हीसाठी पैसे घेऊन यावे म्हणून सासरच्या लोकांनी केलेल्या छळाला कंटाळून माढा तालुक्यात निमगाव (टें, ता. माढा) येथे एका २४ वर्षीय विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर माहेरच्या लोकांनी चक्क पतीच्या (सासर) दारातच अंत्यसंस्कार करून संताप व्यक्त केला.

प्राजक्ता रोशनकुमार चट्टे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून याप्रकरणी मयत प्राजक्ताची आई सविता दत्तात्रेय लोंढे (रा. पिंपळनेर, ता.माढा) हिने फिर्याद दिली. याप्रकरणात टेंभुर्णी पोलिसांनी पती व सासूस अटक केली आहे.पोलीस सूत्राकडील माहितीनुसार मयत प्राजक्ताचे लग्न १५ एप्रिल २०२० रोजी निमगाव (टें) येथील रोशनकुमार चट्टे यांच्याबरोबर झाले होते. लग्न झाल्यानंतर तीन वर्षांपासून पती रोशनकुमार, सासरे नारायण चट्टे व सासू कौशल्या चट्टे हे तिघे प्राजक्तास माहेरहून टीव्ही घेऊन ये, चारचाकी गाडी घेण्यासाठी लाख रुपये आण म्हणून छळ करत होते. 

१७ जून २०२३ रोजी सासरे नारायण चट्टे यांनी विनयभंग केला. यावरून झालेल्या भांडणात प्राजक्ताने १८ जून रोजी सकाळी घरातच विष प्राशन केले. तिच्यावर अकलूज येथे उपचार सुरू असताना २६ जून रोजी प्राजक्ताचा मृत्यू झाला.  टेंभुर्णी पोलिसांनी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर पती रोशनकुमार चट्टे व सासू कौशल्या चट्टे या दोघांना अटक केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गिरीष जोग करीत आहेत.

गुन्हा दाखल करेपर्यंत मृतदेह घेतला नाही

या घटनेनंतर प्राजक्ताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवून देण्यात आला. सोमवारी दुपारी १२.३० वाजता मृतदेह निमगावमध्ये आला मात्र नातेवाईकांनी ताब्यात घेण्यास नकार दिला. सासरच्या लोकांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. दुपारी २.३० वाजे दरम्यान गुन्हा दाखल झाला अन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर प्राजक्ताच्या मृतदेहावर निमगाव येथे सासरी दारातच अंत्यसंस्कार करण्यात करुन नातेवाईकांनी संताप व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!