क्रुरतेचा कळस.अज्ञात मारेकऱ्यांनी अज्ञात व्यक्तीचे तुकडे करून मृतदेह पाटात फेकला.अज्ञात मारेकऱ्यांवर नेवासा येथे गुन्हा दाखल


नेवासा (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगांव येथील पाथर्डी रस्त्यावर असणाऱ्या पाटाच्या पाण्यात पुरुष जातीच्या एका अज्ञात व्यक्तीचे आठ ते दहा तुकडे करुन मृत्युदेह एका गोणीत भरुन फेकून दिल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. काही मृत्युदेह गोणीत भरलेला होता आणि काही भाग पाण्यात तरंगत आल्यामुळे ही घटना उघडकीस आली असून अज्ञात आरोपी विरोधात नेवासा पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देडगांव येथील पाथर्डी रस्त्यावर असणाऱ्या पाटाच्या पाण्यात एक मानवी पायाचा मांसाचा तुकडा आणि पाटाच्या पूर्व दिशेला शरिराचा भाग पाण्यात तरंगतांना दिसून आला. तसेच पुढे काही अंतरावर एका पिवळ्या रंगाच्या गोणीमध्ये अनोळखी मानवी कुजलेले पुरुष जातीचे मुंडके, धडाचा कुजलेला मासांचा तुकडा त्यास करदोडा व गुडघ्याचा कुजलेला मासाचा तुकडे मिळून आल्यामुळे देडगांव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेचा पोलीसांनी दोन पंचासमक्ष पंचनामा केलेला असून पोलीसांनी घटनास्थळी मिळून आलेले मानवी शरीराचे व कुजलेले मांसांचे तुकडे हे शवविच्छेदन करण्यासाठी नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले आहेत. गुरुवार १६ मे रोजी तीन वाजण्याच्या पुर्वी कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी, अज्ञात हत्याराने, मिळून आलेल्या अनोळखी पुरुषाचा खून करून त्याच्या शरीराची विल्हेवाट लावण्याकामी व पुरावा नष्ट करणे कामी त्या अनोळखी व्यक्तीच्या शरीराचे तुकडे करून ते गोणीत टाकून पाटाच्या पाण्यात देडगांवच्या हद्दीतील पाथर्डीकडे जाणाऱ्या मुळा धरणाच्या पाटात फेकून देवून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पोलीसांना मिळून आल्यामुळे देडगांवचे पोलीस पाटील ससाणे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवून अज्ञात आरोपींचा शोधासाठी पथक पाठवले असल्याची माहीती यावेळी सुत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!