महसुल सप्ताह महसुल विभागातर्फे १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा करणार – उपविभागीय अधिकारी डॉ अरुण ज-हाड

महसुल सप्ताह महसुल विभागातर्फे १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा करणार – उपविभागीय अधिकारी डॉ अरुण ज-हाड
गंगापुर (प्रतिनिधी) शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी १ ऑगस्ट (महसूल दिन) ते ७ ऑगष्ट या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ अरुण ज-हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली

गंगापूर तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ ज-हाड यांनी सांगितले की महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा तसेच राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल व शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी १ ऑगस्ट (महसूल दिन) ते ७ ऑगष्ट या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार असून, या कालावधीत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय
यांच्या मार्गदर्शनाखली जिल्ह्यातील इतर तालुक्यां प्रमाणे गंगापुर महसूल प्रशासनाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी तहसीलदार सतिष सोनी, गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे.नप मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, अप्पर तहसीलदार, नायब तहसीलदार,अव्वल कारकून संदीप वाडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तहसीलदार सतीश सोनी यांनी महसूल सप्ताहात घेण्यात येणा-या विविध कार्यक्रमांची माहिती दिली या“महसूल सप्ताह” निमित्त १ ऑगस्ट २०२३ रोजी महसूल दिन साजरा करण्यात येणार असून, महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच महाराजस्व अभियानातंर्गत केलेल्या कामाची दखल घेऊन महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव सन्मान करण्यात येणार आहे. जमीन महसूल अधिनियम कलम 155 खालील ई- हक्क पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणे तलाठयामार्फत निकाली काढणेची कार्यवाही करण्यात येणार आहे. महाराजस्व अभियानातील गाव तिथे स्मशानभूमी, दफनभूमी सुविधा उपलब्ध करण्याबाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. २ ऑगस्ट रोजी युवा संवाद अतर्गंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणासाठी आवश्यक दाखले व प्रमाणपत्रांचे तत्काळ वितरण महाविद्यालय स्तरावर केले जाणार आहेत. विविध घटकांतील लाभार्थी विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती व कार्यक्रमाबाबत माहितीपत्रके शाळा, महाविद्यालयांमध्ये वितरीत करुन अंमलबजावणी करण्यात येणार आहे.शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढणे अद्ययावत करणे यासाठी विशेष मोहिमेर्तंगत शाळेच्या ठिकाणी, स्वस्त धान्य दुकान, बँक, पोष्ट कार्यालय येथे आधार मशीन्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. जिल्हयातील शैक्षणिक संस्था तसेच मंडल स्तरावर व तालूका स्तरावर दाखले वाटपासाठी शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत.
३ ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा या अतर्गंत मान्सुन पुर्व व मान्सुन कालावधीत अवकाळी पाऊस,अतिवृष्टी, पूर यामुळे बाधित झालेल्या नागरिकांना देय असलेल्या सोई सुविधा, नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच पिक विम्यासाठी विविध दाखले तत्काळ तलाठीस्तरावर प्रदान करण्यात येणार आहेत. प्रत्येक मंडळ मुख्यालयामध्ये महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. ४ ऑगस्ट रोजी जनसंवाद कार्यक्रमार्तंगत महसूल अदालतींचे आयोजन करुन सर्व स्तरावरील ४५० अपिले निकाली काढण्यात येणार आहेत. सलोखा योजनेंतर्गत गावा-गावांतील व शेतातील रस्त्यांबाबत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहेत. आपले सरकार या पोर्टलवर तक्रारी निकाली काढणेबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. . ५ ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमार्तंगत सैनिकांच्या विविध अडीअडचणींबाबत आढावा घेऊन तातडीने निराकरण येईल तसेच जमिनीचे तंटे, प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येतील.


तसेच ६ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील महसूल संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांची प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढण्यात येतील. ७ ऑगस्ट रोजी महसूल विभागामार्फत महसूल सप्ताह निमित्त घेतलेल्या विविध उपक्रमांबाबतची फलनिष्पत्ती व विशेष उल्लेखनीय कामकाज करणा-यांचा गौरव करण्यात येणार व महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!