धक्कादायक प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या, मारहाण करुन विहिरीत फेकून दिलं.. कन्नड तालुका हादरला

पिशोर पोलिसांत १७ लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून,८ आरोपींना अटक केली आहे. 

कन्नड (प्रतिनिधी) आपल्या मुलीसोबत प्रेम प्रकरण आहे, या संशयावरुन तरुणीच्या घरच्या मंडळींनी गावातील एका तरुणाला लाठ्या-काठ्यांनी आधी बेदम मारहाण केली. त्यानंतर जखमी झाल्यावर जिवंत असतानाच विहिरीत फेकून दिल्याची ही संतापजनक घटना कन्नड तालुक्यातील खातखेडाच्या बामणवाडी येथे मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी घडली. घडली आहे. जखमी तरुणाला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नारायण रतन पवार वय २२ वर्ष, रा. खातखेडा, कन्नड असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पिशोर पोलिसांत १७ लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ८ आरोपींना अटक केली आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत नारायण याच्या घरासमोरच आरोपी काकुळते हे कुटुंब राहते. रविवारी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी काकुळते कुटुंबातील एक लहान मुलगा नारायणच्या घरासमोर आला आणि दरवाजात एक चिठ्ठी फेकून निघून गेला. त्या मुलाने फेकलेली चिठ्ठी नारायणने उचलली. त्यावेळी घरात त्याचे आई-वडीलही बसलेले होते. काय आहे चिठ्ठीत? असे त्यांनी विचारल्यानंतर त्याने चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. चिठ्ठीतील मजकूर वाचून सर्वांना धक्का बसला. ते प्रेमपत्र होते. काकुळते यांच्या घरातील एका तरुणीने ते नारायणला पाठवले होते. त्यामुळे नारायणच्या कुटुंबातील सदस्यांनी संबंधित मुलीच्या घरच्यांना याबाबत माहिती दिली. मात्र, मुलीने आपण चिठ्ठी पाठवलीच नसल्याचे सांगितल्याने यावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला. पण तो मिटला सुद्धा होता. 

मारहाण करुन विहिरीत फेकेलं…

दरम्यान रात्री वाद मिटल्यावर सोमवारी सायंकाळी नारायण आणि त्याचे आईवडील, भाऊ, बहीण हे घरात बसलेले असताना, अचानक कुणी तरी दरवाजाची कडी वाजवली. दरवाजा उघडताच समोर प्रवीण नारायण काकुळते हातात काठी घेऊन उभा होता. त्याने नारायणला शिवीगाळ करत घरातून बाहेर ओढले. बाहेत त्या मुलीचे अख्खे कुटुंब हातात लाठ्याकाठ्या घेऊन उभे होते. नारायणला बाहेर ओढताच त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. त्याला दगड, काठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. नारायणच्या घरच्यांनी आरोपींच्या तावडीतून त्याला सोडवण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, आरोपींची संख्या जास्त असल्याने तो असफल ठरला. तसेच, त्यानंतर जखमी नारायणला विहिरीत फेकून दिल्याचा आरोप त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी केला आहे. 

*पोलिसांत गुन्हा दाखल..*

दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तर घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच, रात्री उशिरा गावकऱ्यांच्या मदतीने नारायणचे प्रेत विहिरीबाहेर काढण्यात आले. पोलिसांनी एकूण १७ लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, ८ जणांना अटक केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!