अवैध वाळू उपसा विरोधात पुरीच्या ग्रामस्थांचा एल्गार महीला मुलाबाळासह नदीपात्रात उतरुन उपोषणाला सुरुवात तहसीलदार यांची उपोषणस्थळी भेट.


गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील पुरी शिवारातील शिवना नदी पात्रातून रात्रंदिवस होत असलेला जेसीबी व हायवा वाहनाद्वारे हजारो ब्रास
अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी रखरखत्या उन्हात ग्रामस्थ ,महिला मुलाबाळासह शिवना नदीपात्रात उतरल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.
तहसीलदार सतीश सोनी यांनी नदीपात्रात उपोषणाला बसलेल्या नागरिकांची भेट घेऊन कारवाईचे आश्वासन दिले परंतु उपोषणाला बसलेल्या नागरिकांनी जोपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे ठणकावून सांगितले.


गंगापूर तालुक्यातील पुरी येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी दोन महिन्यांपासून प्रशासनास अनेकदा निवेदन देऊन ही कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी ३१ मे रोजी आपला मोर्चा नदी पात्रात वळवून सकाळी दहा वाजेपासून उपोषणास बसले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की पुरी ग्रामपंचायतने २० फेब्रुवारी २४ रोजी गंगापूर तहसीलदार, पोलीसांना शिवना नदीपात्रात होत असलेली अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी निवेदन देऊन अवैध वाळू उपसा बंद करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर मंडळ अधिकारी तलाठी यांनी पंचनामे केले व दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यलयाला प्रस्तावित केल्यानंतरही काही उपयोग झाला नसल्याने पुन्हा ग्रामस्थांनी २१ मे २४ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी ,तसेच वैजापूर चे उपविभागीय अधिकारी, गंगापूर तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना स्पीड पोस्ट द्वारे निवेदन देऊन शिवना नदीतून होत आलेला बेसुमार वाळू उपसा बंद करण्यासाठी मागणी केली . कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी दखल घेतली नाही विनापरवाना वाळू उपसा बंद न केल्याने ग्रामस्थांनी २८ मे रोजी पुन्हा अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता.दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, पुरी शिवारातील शिवना नदी पात्रातून गेल्या दोन महिन्यांपासून बेकायदा विना परवानगी वाळू उपसा जेसीबी ,हायवा डंपर ने प्रचंड प्रमाणात चालू आहे.संबंधित कार्यालयाला तीन चार वेळेस पत्र देऊन पंचनामा करून अवैध वाळू उखनन करणाऱ्याच्या शेतीवर बोजा चढविण्यासाठी मागणी केली.पुरी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहीर जवळ वाळूचे मोठमोठे खड्डे केल्याने विहिरीला धोका निर्माण झाला असून विहिरीचे पाणी आटले असून दोन दिवसाआड गावकऱ्यांना पिण्यास पाणी पुरवठा होत आहे.गावाला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
प्रशासनाने दोन दिवसात अवैध वाळू उपसा बंद न केल्यास समस्त गावकरी शिवना नदी पात्रात उपोषणास बसणार आहे. असे निवेदनात नमूद केले होते.शेवटी या प्रकरणी
प्रशासनाने गावकऱ्यांच्या निवेदनला केराची टोपली दाखवून दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थ महिला मुलाबाळासह शुक्रवारी ३१ मे रोजी सकाळी नदी पात्र गाठून तापलेल्या वाळूत लहान लेकरं आणि वयोवृद्ध मंडळी घेऊन उपोषणास बसले होते.
यावेळी मंडळ अधिकारी बाळासाहेब जाधव,तलाठी श्रीराम जोशी, तलाठी सुनील ढोले ,ग्रामसेवक सुप्रिया पवार ,पोलीस पाटील अब्बास पठाण ,महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर मोरे,सरपंच, उपसरपंच व समस्त ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया:-
पुरी शिवारातील शिवना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला आहे या उपसा केलेल्या खड्यांचे मोजमाप करुन संभधीत शेतकऱ्यांचा सातबा-यावर बोजा टाकणार व वाहतूक करणाऱ्या वाहनांचे नंबर आमच्याकडे आहे त्या सर्व वाहनधारकांवर कारवाई करणार.
तहसीलदार सतीश सोनी.

प्रतिक्रिया:

वाळू वाहतूक करणाऱ्याच्या हातापाया पडून सांगितले बाबा हो, शासनाने थडी खायला दिली.वाळू उपासाला दिली नाही.वाळू उपशामुळे पाणी कमी होऊन आज गावाला पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे.तुम्ही नदीतून वाळू काढु नका वाळू काढल्यामुळे गांवाला पाणीपुरवठा करणारी विहीर कोरडी पडल्याने पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे
वंदना दादासाहेब राऊत सरपंच पुरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!