शिवना नदीच्या पात्रात डोक्यात दगड घालून युवकाचा खून


वैजापूर (प्रतिनिधी) पुर्व वैमनस्यातुन युवकाचा डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या दोन भावांच्या वैजापूर पोलिसांनी काही तासांतच मुसक्या आवळल्या असुन दोघांवर खुन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैजापूर तालुक्यातील लासुरगाव येथे शिवना नदीपात्राजवळ उघडकीस आलेल्या युवकाच्या खुनाच्या घटनेत पोलिसांनी दोन चोरट्या सख्ख्या भावांना ताब्यात घेतले
जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्यांनी कृष्णा पोपट हरिश्चंद्रे (२७) राहणार लासुरगांव याचा डोक्यात दगडाने वार करुन खुन केल्याचे उघड झाले आहे. राजु मुस्ताक पठाण (२५) व जुनेद मुस्ताक पठाण (२४) अशी त्यांची नावे असुन ते गंगापूर तालुक्यातील भानवाडी (लासूर स्टेशन) येथील रहिवासी आहेत

वैजापूर तालुक्यातील लासूरगाव येथे शिवना नदीच्या पात्राजवळ एका तरुणाचा खून झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वैजापूर उपविभागाच्या सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी, पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, शिल्लेगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, उपनिरीक्षक मनोज पाटील, हेड कॉन्स्टेबल किरण गोरे, पोलीस अंमलदार प्रशांत गिते, गणेश कुलट, गणेश पैठणकर, गोपाल जाणवाल, दिनेश गायकवाड यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांनी भेट देऊन पाहणी केली. लासूरगाव येथील नदीपात्रात कडेला यात्रेतील पाळण्याजवळ कृष्णा हरिश्चंद्रे या तरुणाचा मृतदेह आढळून आला. याचा तपास सुरू केला असता अट्टल गुन्हेगार पठाण बंधूंनी पूर्ववैमनस्यातून हा खून केल्याचे निष्पन्न झाले. पठाण बंधू हे चोरी व लुटमारीच्या आरोपाखाली जेलमध्ये होते. जेलमधुन बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा गुंडगिरी सुरु केली. लासुरगाव येथील यात्रेत त्यांनी बाहेरून आलेल्या दुकानदारांना दमदाटी केली. त्यामुळे कृष्णा हरिश्चंद्रे यांच्यासह लासुरगावच्या काही मुलांसोबत राजु व जुनेद यांचे भांडण झाले. एक वर्षांपूर्वी मोबाईल हिसकावण्याच्या कारणावरुनही मयत कृष्णा व राजु पठाण यांचे भांडण झाले होते. त्यातच लासुरगावच्या यात्रेत दोन्ही भावांचे पुन्हा कृष्णासोबत भांडण झाल्याने दोघांनी कृष्णाचा काटा काढायचा ठरवले. दरम्यान, कृष्णा हा रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घरी आला व जेवण करुन पुन्हा यात्रेत जातो म्हणून बाहेर पडला. पण तो परतलाच नाही.

रात्री अंधारात डोक्यात घातला दगड

कृष्णा रात्री बारानंतर घराबाहेर आला असता दबा धरून बसलेल्या राजु व जुनेद या दोघांनी दगडाने ठेचून त्याचा खुन केला. मयत कृष्णा हा चालक होता. दरम्यान, पोलिसांना याबाबत सुगावा लागताच अवघ्या काही तासांतच पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी मयत कृष्णा याचा भाऊ सुदाम हरिश्चंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!