जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला एकूण पाच पदके…संयुक्ताची लक्षवेधी कामगिरी..

जिम्नॅस्टिक्स

*संयुक्ताची लक्षवेधी *कामगिरी*

क्रीडा प्रतिनिधी, मापूसा
संयुक्ता काळे आणि रिचा चोरडिया यांच्या दिमाखदार कामगिरीच्या बळावर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्समध्ये शनिवारी महाराष्ट्राने आपले वर्चस्व गाजवले. अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण पाच पदके मिळवली. यात संयुक्ताने एक सुवर्ण आणि एक रौप्य अशी दोन पदके जिंकली. तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये संयुक्ता काळे पाच सुवर्ण आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके मिळवून वर्चस्व गाजवले. रिचाने आज दोन कांस्य पदके पटकावली.
मापूसा येथील पेड्डेम इनडोअर स्टेडियमवर झालेल्या महिलांच्या तालबद्ध जिम्नॅस्टिक्समधील क्लब प्रकारात महाराष्ट्राच्या संयुक्ता काळेने सुवर्णपदकाला गवसणी घालताना २४.३० गुण मिळवले, तर सहकारी रिचा चोरडियाने २०.३० गुण मिळवत कांस्य पदक प्राप्त केले. हरयाणाच्या लाइफ अडलखाला (२३.११ गुण) रौप्य पदक मिळाले. रिबन प्रकारात संयुक्ताने २३.१५ गुण मिळवत रौप्य पदक मिळवले. तर रिचाने २०.१५ गुणांच्या सहाय्याने कांस्य पदक पटकावले. हरयाणाच्या लाइफने (२३.७० गुण) सुवर्ण पदक मिळवले.
महिलांच्या कलात्मक जिम्नॅस्टिक्समधील फ्लोअर एक्सरसाइज प्रकारात इशिता रेवाळेला (११.१०० गुण) कांस्य पदक मिळवण्यात यश मिळाले. पश्चिम बंगालच्या प्रणती दासला (११.५३३ गुण) सुवर्ण आणि ओडीशाच्या प्रणती नायकला (११.४०० गुण) रौप्य पदक मिळाले. बॅलन्सिंग बिम प्रकारात इशिता रेवाळेला (१०.००० गुण) पाचव्या आणि रिद्धी हत्तेकरला (९.९६७ गुण) सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

पुरुषांच्या कलात्मक जिम्नॅस्टिक्समधील टेबल व्हॉल्ट प्रकारात आर्यन दवंडेला (१२.८३४ गुण) सहावा क्रमांक, तर सिद्धांत कोंडेला (१२.३६७ गुण) आठवा क्रमांक मिळाला. हॉरिझंटल बार प्रकारात सिद्धांतला सहावा क्रमांक मिळाला.

यश स्वर्गवासी आजोबांना समर्पित! -संयुक्ता काळे
तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये पाच सुवर्ण आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके मिळवणाऱ्या संयुक्ता काळेने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक पूजा आणि मानसी सुर्वे तसेच आई-वडिलांना दिले. परंतु कारकि‍र्दीत सदैव पाठबळ देणाऱ्या आणि नुकत्याच स्वर्गवासी झालेल्या आजोबांना तिने आपले यश समर्पित केले.
संयुक्ता ठाण्याच्या एम्बर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बारावी इयत्तेत शिकत आहे. यंदा तिने दुसऱ्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. “मागील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मला एकच सुवर्ण पदक मिळाले होते. पण ते माझ्यासाठी खास ठरले होते. कारण ते माझ्या कारकीर्दीतील शंभरावे सोनेरी यश होते. पण यंदा मोठे यश मिळाले, याचा अभिमान वाटतो,” असे संयुक्ताने सांगितले.
“यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा अनुभव अतिशय चांगला आहे. गोव्याने उत्तम आयोजन केले आहे. इतक्या कमी वेळात इतके मोठे स्टेडियम सज्ज केले आहे. त्यात एरोबिक्स, एक्रॉबेटिक्स, तालबद्ध आणि कलात्मक अशा चारही प्रकारचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहित्य उभारणे, हे आव्हान त्यांनी उत्तम पेलले. ते सर्वच क्रीडपटूंसाठी प्रेरणादायी ठरले. गोव्याच्या क्रीडारसिकांनी स्पर्धेला अप्रतिम प्रतिसाद दिला. महाराष्ट्र सोडून अन्यत्र आहोत, असे वाटतच नव्हते,” असे संयुक्ता यावेळी म्हणाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!