मल्लखांब मध्ये रुपाली गंगावणेचा सोनेरी चौकार; महाराष्ट्राला नऊ सुवर्णपदके

*पुरुष संघ पहिल्यांदाच विजेता*

क्रीडा प्रतिनिधी, पणजी
पारंपारिक खेळ प्रकारात आपला दबदबा कायम ठेवताना महाराष्ट्र संघाने मल्लखांब क्रीडा प्रकारात शनिवारी नऊ सुवर्णपदकांची लयलूट केली. महाराष्ट्राच्या रुपाली गंगावणेने सोनेरी चौकाराची कामगिरी केली. यात वैयक्तिक तीन आणि सांघिक गटातील एका सुवर्णपदकाचा समावेश आहे.
गुणवंत युवा खेळाडू शुंभकर, कृष्णा, दीपक, अक्षय आणि ऋषभने मल्लखांबमध्ये सर्वोत्तम कामगिरीतून महाराष्ट्राला सांघिक गटात सुवर्णपदक मिळवून दिले. हीच लय कायम ठेवताना दीपक शिंदेने वैयक्तिक गटात विजेतेपदाचा पराक्रम गाजवला. तसेच याच गटात महाराष्ट्राचा शुभंकर खवले हा कांस्यपदक विजेता ठरला. रुपालीने महिलांच्या वैयक्तिक गटाचा किताब आपल्या नावे केला.
महाराष्ट्र पुरुष संघ पहिल्यांदाच मल्लखांब क्रीडा प्रकारामध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. या संघाने अंतिम फेरीमध्ये १२८.७० गुणांची कमाई केली. स्वप्निल आणि प्रणाली जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने हे यश संपादन केले आहे.
पुरुष गटात मध्य प्रदेश संघाने रौप्यपदकाची कमाई केली. तसेच छत्तीसगड संघ कांस्यपदक विजेता ठरला.
महाराष्ट्र पुरुष संघाने सांघिक गटात सर्वोत्तम कामगिरी केली. यामुळे संघाला हा सोनेरी यशाचा पल्ला यशस्वीपणे गाठता आला.

पदक विजेते
सुवर्ण : दीपक शिंदे (वैयक्तिक)
सुवर्ण : रुपाली गंगावणे (वैयक्तिक)
सुवर्ण :रुपाली गंगावणे (रोप मल्लखांब)
सुवर्ण : रुपाली गंगावणे (पोल मल्लखांब)
सुवर्ण : अक्षय तरल (रोप मल्लखांब)
सुवर्ण : अक्षय तरल (पोल मल्लखांब)
सुवर्ण : शुभंकर खवले (हँगिंग मल्लखांब)
रौप्य : जान्हवी जाधव (पोल मल्लखांब)
रौप्य : नेहा क्षीरसागर ((रोप मल्लखांब)
कांस्य :दीपक शिंदे (पोल मल्लखांब)
कांस्य : दीपक शिंदे (हँगिंग मल्लखांब)
कांस्य : शुभंकर खवले (वैयक्तिक)

*मल्लखांबमध्ये महाराष्ट्राचा विक्रम* : शिरगावकर*
मल्लखांब खेळ प्रकारात महाराष्ट्र संघाने उल्लेखनीय कामगिरी करत विक्रमाला गवसणी घातली. यामुळे संघाला या क्रीडा प्रकारात आपला दबदबा कायम ठेवता आला. युवा खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी करताना महाराष्ट्राला ९ सुवर्णांसह १४ पदकांचा बहुमान मिळवून दिला. ही निश्चितपणे सर्वोत्तम कामगिरी ठरली, अशा शब्दांत महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर यांनी पदक विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!