वाळूज एमआयडीसी पोलिसांनी बारा तासात अपहरण करून डांबून ठेवलेल्या मुलीची केली सुटका, दोन आरोपींना ठोकल्या बेड्या


गंगापूर (प्रतिनिधी) घरातुन अपहरण करून डांबुन ठेवलेल्या अपहत मुलीची वाळूज एमआयडीसी पोलिसांची बारा तासात सुटका करून दोन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
उसने घेतलेले पैसे परत करत नसल्याने ओलीस ठेवण्यासाठी चारचाकी वाहनातून मुलीचे अपहरण करून तिला डांबून ठेवून पिडीत मुलीच्या आईस ‘तुला गुरु भेटला, खाली हात येऊ नको, नसता मुलीला फाडून टाकू’. अशी धमकी देणाऱ्यांचा डाव वाळुज एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या बारा तासात उधळून लावत अपहरण केलेल्या मुलीची सुटका केली. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोन जण फरार आहे. हे अपहरण नाट्य शुक्रवारी 3 मे रात्री 9 वाजेच्या सुमारास वाळुज महानगरात घडले.

पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार  सिडको महानगर- 1, ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील 35 वर्षीय महिला गुरुवारी 2 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पुणे येथे भावाला मुलगी पाहणासाठी गेली होती. त्यावेळी तीची मुलगी एकटीच घरी होती. शुक्रवारी (ता.3) रोजी पुण्यावरुन छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना रात्री 9:21 वाजेच्या सुमारास तिला मुलीच्या फोनवरून एक महिला म्हणाली की, ‘येताना खाली हात येऊ नको, तुला गुरु भेटला आहे, कोणाला सांगायचे ते सांग, पोरीला फाडुन टाकीन’. हा आवाज जयभवानी चौक, बजाजनगर येथील विजयमाला इंगळे हिचा असल्याचे तिने ओळखले. त्यानंतर ती घरी आली असता तेथे तिची मुलगी दिसली नाही. तसेच घरातील सामानाची नासधुस केल्याने ते अस्ताव्यस्त पडलेले होते. पिडीत मुलीचा घराचे आजूबाजूला व इतरत्र शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. त्यामुळे तिने घरमालकाला विचारले असता त्याने सांगितले की, शुक्रवारी (ता.3) रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास तुमच्या दिदीला 3 अनोळखी माणसं व महिला यांनी पांढऱ्या रंगाची कार (एम एच 12, क्यू डब्ल्यू -2245) मध्ये बसवून घेऊन गेले. त्यापैकी एक तिला उचला उचला असे म्हणत होता. असे सांगितले. तीच्या मुलीस विजयमाला इंगळे व तिचे सहकारी यांनी उचलून नेले. ही खात्री होताच महिलेने याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 363, 367, 427, 452, 34 भादंवि. प्रमाणे गुन्हा दाखल केला.

उसने पैसे परत न दिल्याने अपहरण –
आरोपी विजयमाला इंगळे यांच्या कडून फिर्यादी महिलेने दीड लाख रुपये व सोन्याचे काही दागिने उसने घेतले होते. मात्र ते तिने परत केले नाही. याच कारणावरून दोघींमध्ये गेल्यावर्षी भांडण झाले होते. त्यानंतर फिर्यादी ही जयभवानी चौक येथील रूम सोडून सिडको महानगर-1, येथे राहण्यास आली. तेथूनच आरोपी बंटी बबलीने इतर दोघांच्या मदतीने तिच्या मुलीचे अपहरण केले.
पोलिसांनी यंत्रणा हलवुन बारा तासात मुलीची सुटका केली –
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करताना पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दोन पथक स्थापन करून पिडीत मुलीचा व आरोपीचा शोध सुरू केला. तसेच रात्रगस्त अधिकारी व अंमलदार यांनासुध्दा सुचना देवून शोध कामी रवाना केले. शनिवारी (ता.4) रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास यातील आरोपी महिला विजयमाला अंताजी इंगळे (वय 30) रा. सिडको गार्डनजवळ भाडयाने वाळूज महानगर – 1 छत्रपती संभाजीनगर हिस ताब्यात घेवून विचारपुस केली. तिने गुन्ह्याची कबुली देत तिचा प्रियकर साथीदार सोमनाथ परसराम बारसे (वय 35) रा. कमळापूर ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर व अन्य दोन याच्या मदतीने अपहरण करून मुलीला सिडको वाळुज महानगर -1, येथील एका बंद रूम मध्ये कोंडून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तेथे धाव घेत एका बंद रूम मधून पिडीत मुलीस बाहेरून कुलुप लावून आत मध्ये कोंडून ठेवलेल्या अवस्थेतून सुखरुप सुटका केली.
तसेच गुन्हयातील आरोपी महिला विजयमाला अंताजी इंगळे व सोमनाथ परसराम बारसे यांना अटक केली आहे. इतर आरोपीतांचा शोध सुरु आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहिय, पोलीस उप आयुक्त नितीन बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, पोनि. जयवंत राजूरकर, सपोनि. मनोज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदिप शिंदे, महिला पोलीस हवालदार रेखा चांदे, पोलीस हवालदार बाळासाहेब आंधळे, किशोर घुसले, विनोद नितनवरे, पोलीस अंमलदार राजाभाऊ कोल्हे, श्रीकृष्ण कांबळे, प्रशांत सोनवणे, बबलू थोरात, विजय पाटील, समाधान पाटील, गणेश सागरे, यशवंत गोबाडे, प्रियंका तळवंदे यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!